नितीन नायगावकर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
अमर्याद मानवी हस्तक्षेपामुळे निसर्ग धोक्यात आला आहे. पण, गायी व मेंढरंसुद्धा निसर्गाला अपाय पोहोचवित आहेत. गुरं मिथेन वायू उत्सर्जित करतात आणि त्यामुळे वातावरणाला धोका निर्माण झाला आहे. प्राण्यांकडून होणाऱ्या मिथेनच्या उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याचा प्रकल्प ऑस्ट्रेलियात सुरू झालं आहे.
गाई, मेंढ्या, शेळ्या आणि म्हशींसारख्या रुमीनंट्समध्ये विशेष प्रकारची पचनसंस्था असते. त्यांच्या पोटात चार कप्पे असतात, त्यापैकी एकात अर्धवट पचलेले अन्न साठवण्यास आणि ते आंबवण्यास मदत करते. या प्रक्रियेतून मिथेन वायू तयार होतो. गायी आणि मेंढ्यांसारखे प्राणी प्रामुख्याने बर्पिंगद्वारे म्हणजेच गुरगुरुन व ढेकर देऊन मिथेन उत्सर्जित करतात. दुग्धउत्पादक देशांत मोठ्या प्रमाणात गुरेढोरे आणि मेंढ्यांचे प्रमाण पाहता, हे उत्सर्जन लक्षणीय प्रमाणात वाढले आहे. मानवाकडून होणाऱ्या मिथेन उत्सर्जनांच्या तुलनेत जनावरांकडून होणारे उत्सर्जन २७ टक्के असल्याचे मानले जाते.
मिथेनचा धोका
मिथेन वाया वातावरण बदलाच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. मिथेन हे पूर्व औद्योगिक काळापासून तापमानवाढीसाठी ३० टक्के जबाबदार आहे. कार्बन डाय ऑक्साईडनंतर मिथेन प्रदूषण वाढवण्यात दुसऱ्या क्रमांकाचे कारण आहे. युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रामच्या अहवालानुसार, येत्या २० वर्षांच्या कालावधीत, कार्बन डायऑक्साइडपेक्षा मिथेन तापमानवाढीसाठी ८० पट अधिक शक्तिशाली आहे. भू-स्तरीय ओझोनच्या रूपात पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या अगदी वर तयार होणारा एक रंगहीन आणि अत्यंत त्रासदायक वायू तयार करण्याचे काम मिथेन करते. २०२२ च्या अहवालानुसार, जमिनीच्या पातळीच्या ओझोनमुळे दरवर्षी १ दशलक्ष अकाली मृत्यू होऊ शकतात.
जनावरांसाठी पूरक आहार
प्राण्यांकडून होणारे मिथेनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्लायमेट टेक्नॉलॉजीचे संशोधन सुरू आहे. या स्टार्ट-अप प्रकल्पात मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी १२ मिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. अमेझॉनचे मुख्य कार्यकारी जेफ बेझोस आणि अलिबाबाचे सह-संस्थापक जॅक मा यांनी देखील या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. या प्रकल्पांतर्गत गायींच्या आहारात फेरबदल करण्यात येत आहे. गायींसाठी पूरक आहार विकसित केला जातो. गायींना दिल्या जाणाऱ्या सप्लिमेंट्समध्ये मुख्यतः लाल समुद्री शैवाल समाविष्ट केले जाते ज्यामुळे गायींमधील मिथेन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट करते असे मानले जाते.
Cow Sheep Pollution Emission Research Report