मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात दुधाला किमान भाव मिळावा, दुधाच्या खरेदी दरात कपात होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये या उद्देशाने गायीच्या दुधाला प्रतिलिटर किमान ३४ रूपये भाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतल्याची माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
राज्यातील दूध दर प्रश्नाबाबत विविध दूध उत्पादक शेतकरी संघटना व पशुखाद्य उत्पादक प्रतिनिधींसोबत पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच महत्त्वाची बैठक झाली.
सहकारी आणि खासगी दूध संघांचा परिचालन खर्च, तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च विचारात घेऊन, शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त भाव मिळावा, या अनुषंगाने दूध दर निश्चितीसाठी शासन निर्णयान्वये समिती गठित करण्यात आली होती. सहकारी व खासगी दुग्ध क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधींचा सदस्य म्हणून समावेश असलेल्या या समितीने शासनास केलेल्या शिफारशीनुसार राज्यात गायीच्या दुधासाठी (३.५/८.५) गुणप्रतिकरिता किमान खरेदी दरास मान्यता देतानाच दर विनाकपात दूध उत्पादक शेतकऱ्यांना अदा करणे अभिप्रेत राहिल, असा निर्णय शासनाने घेतल्याचे मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.
दुधाला रास्त भाव मिळावा यासोबतच देशातील स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा आढावा घेऊन समितीने दर ३ महिन्यांनी किमान दूध खरेदी दर निश्चितीबाबत शासनास शिफारस करावी. विशिष्ट अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास, शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार ३ महिन्याच्या आतही समितीने दूध दराबाबत शासनास शिफारस करावी, किमान दूध दराची अंमलबजावणीबाबत जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी दुग्धव्यवसाय विकास आयुक्त यांच्यामार्फत शासनास दरमहा अहवाल सादर करावा असे निर्देश समितीला देण्यात आल्याची माहिती मंत्री श्री. विखे-पाटील यांनी दिली आहे.