विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर डोसच्या मधल्या वेळेचे अंतर वाढविल्याने लोक चिंतीत आहेत. ज्या लोकांची अपॉइंटमेंट बुक झालेली आहे, त्यांनाच दुसरा डोस मिळणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले की, दुसर्या डोससाठी आधीच बुक केलेली अपॉइंटमेंट रद्द होणार नाही. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढविल्याबाबतचे बदल कोविन अॅपवर पहायला मिळणार आहेत. ज्यांना कोविशिल्डचा दुसरा डोस घ्यायचा आहे त्यांनी नव्या नियमाप्रमाणे अपॉइंटमेंट बुक करावी असे आवाहन करण्यात आले आहे. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर आधी सहा ते आठ आठवडे होते.
भारतात आता १२ ते १६ आठवडे इतके अंतर ठेवण्यात आले आहे. कोव्हॅक्सिन लशीचा दुसरा डोस २८ ते ४२ दिवसांनंतर घेऊ शकतात. तसेच कोविशिल्डचा दुसरा डोस ८४ ते ११२ दिवसांच्या अंतराने घेऊ शकतात असे कोविन अॅपवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
कोविन संकेतस्थळावर नवे बदल करण्यात आले आहेत. त्यासाठी आता नवी अपॉइंटमेंट ८४ दिवसांच्या अंतराने होणार आहे. असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. स्थानिक पातळीवर सर्व कर्मचार्यांना या नव्या नियमांबाबत अवगत करून द्यावे, अशा सूचना केंद्राने राज्य सरकारांना केल्या आहेत.