नवी दिल्ली – कोरोना प्रतिबंधित लशींमधील कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर कमी होऊ शकते, असा दावा अनेक माध्यमांच्या वृत्तांतून करण्यात आला होता. केंद्र सरकारने आता त्यावर उत्तर दिले आहे. कोविशील्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याबाबत सध्या कोणत्याच प्रकारे विचार करण्यात आलेला नाही, अशी माहिती सरकारच्या एका मोठ्या तज्ज्ञाने दिली. आंतरराष्ट्रीय प्रवास करणार्यांसाठी तसेच शिक्षणासाठी परदेशात जाणार्यांसाठीच्या नियमांमध्ये संशोधन करणे आवश्यक होते, असेही त्यांनी सांगितले.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, खासगी केंद्रांवर लस घेणाऱ्या नागरिकांना न्यायालयाच्या आदेशानुसार दुसरा डोस लवकर घेण्याची परवानगी मिळू शकते. परंतु सरकारने हा दावा फेटाळला आहे. तज्ज्ञांच्या अभ्यासाचा हवाला देत सरकारने कोविशील्डच्या दुसर्या डोससाठी १२ आठवड्यांची प्रतीक्षा अनिवार्य केली आहे. दोन डोसमधील अंतर अधिक असेल, तर लशीची परिणामकारता दिसून येते, असे सरकारचे म्हणणे आहे.
लसीकरणावर राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समुहाच्या (एनटीएजीआय) कोविड कार्यकारी समुहाचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा सांगतात, काही माध्यमांच्या वृत्तांमध्ये लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी करणार असल्याचे प्रसिद्ध झाले आहे. परंतु हे वृत्त चुकीचे आहेत. विविध श्रेण्यांमधील लोकांसाठी वेगवेगळे नियम लागू होऊ शकत नाहीत. हा भेदभाव होईल.
विज्ञान अशा प्रकारे काम करत नाही. वैज्ञानिकदृष्टीने आम्ही या निर्णयावर ठाम आहोत. परंतु ही एक गतिशील स्थिती आहे. भविष्यात दोन डोसमधील अंतर कमी करण्याच्या फायद्यांना पाठिंबा देण्यासाठी तसा डाटा उपलब्ध झाला, तर आमचे तज्ज्ञ निश्चितच पाहतील. कोणताही निर्णय शास्त्रीयरितीने घेण्यात येईल. तज्ज्ञांच्या समितीने मे महिन्यात कोविशील्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर सहा ते आठ आठवड्यांवरून वाढवून १२ ते १६ आठवडे करण्याची शिफारस केली होती. पूर्वी हे अंतर ४ ते सहा आठवड्यांचे होते.