विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोविशिल्डचा एकच डोस प्रभावी ठरेल, यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू असून त्याचे परिणाम ऑगस्टपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे. मात्र भारतातील काही वैज्ञानिकांनी कोरोनावर मात करणाऱ्यांना कोविशिल्डचा एकच डोस पुरेसा आहे, असे संशोधन सादर केले आहे. संक्रमणामुळे अँटीबॉडी विकसित होतात, त्यामुळे अशांना एकच डोस पुरेसा आहे, असे या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
आसाम आणि जम्मू-काश्मीरमधील वैद्यकीय संस्थांमध्ये हे संशोधन करण्यात आले. कोविशिल्डच्या संदर्भात जगातील हे पहिलेच संशोधन असल्याचा दावाही करण्यात आला आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (आयसीएमआर)च्या वैज्ञानिकांनीही हे संशोधन केले आहे. एवढेच नाही तर सरकारने याकडे लक्ष दिले तर लस कमी असतानाही लसीकरण वेगाने होऊ शकेल, असे आयसीएमआरमधील वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
आयसीएमआरचे आसाममधील विभागीय संशोधन केंद्र, काश्मीरचे शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि आसाम मेडीकल कॉलेज यांच्या संयुक्त संशोधनाला मेडिकल जनरल मेडरेक्सिव्हने प्रकाशित केले आहे. यासाठी १२१ लोकांना निवडण्यात आले. यातील ४६ लोकांमध्ये सीरो पॉझिटीव्हिटी आढळून आली. तर इतर ७५ लोकांमध्ये तसे चित्र नव्हते.
सीरो पॉझिटिव्हिटी म्हणजे संबंधित व्यक्तीच्या शरीरात कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या अँटीबॉडी होय. दोन्ही वर्गाला कोविशिल्डचा एक-एक डोस देण्यात आला. त्यानंतर ३५ दिवसांपर्यंत त्यांचा फॉलोअप घेण्यात आला. तसेच दुसरा डोस दिल्यानंतर करण्यात आले. या प्रक्रियेचे विश्लेषण केल्यानंतर असे लक्षात आले की, ज्यांच्यात पहिले संक्रमणाविरुद्ध अँटीबॉडी होत्या, त्यांना कोव्हिशिल्डचा एकच डोस पुरेसा ठरला.
कारण डोस घेतल्यानंतर त्यांच्यात आवश्यकते एवढ्या अँटीबॉडी विकसित झालेल्या होत्या. अशांना दुसरा डोस घेण्याची गरज नाही. तर दुसऱ्या वर्गाला दोन डोसची आवश्यकता असल्याचे नोंदविण्यात आले. हे संशोधन मोठ्या स्तरावर करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
दुसरा डोस प्रभावशून्य
पहिले संक्रमण होऊन गेलेल्या लोकांमध्ये कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसचा कुठलाही प्रभाव झाला नाही, असे या संशोधनात आढळले. संक्रमण आणि पहिला डोस यामुळे पुरेशा अँटीबॉडीज संबंधित लोकांमध्ये विकसित झालेल्या होत्या.