नवी दिल्ली – भारत आणि अमेरिकेसह जगभरात कोरोनाच्या प्रकोपात आता तरुण सर्वाधिक बाधित होत असल्याचे निष्पन्न होत आहे. भारतातही ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण अफ्रिकेतील स्ट्रेन आढळला आहे. दिल्ली, मुंबईसह इतर शहरांमध्ये कोरोनाबाधितांमध्ये तरुणांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. एका अहवालानुसार, मुंबईत १ ते ११ एप्रिलपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी १० टक्के रुग्ण ४५ वर्षांच्या खालील होते. अमेरिकेत कोरोना विषाणूचा ब्रिटन स्ट्रेनचा (बी. १.१.७) प्रादुर्भाव इतका वाढला, की रुग्णालयात तरुण रुणांची एकच गर्दी झाली आहे.
म्हणून तरुण बाधित
यूएस सेंटर डिसिस कंट्रोल अँड प्रिव्हेंशनचे संचालक डॉ. रॉचेल वालेंस्की यांच्या माहितीनुसार, तरुणांचे लसीकरण न झाल्यामुळे त्यांची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचे ४० टक्के नवे रुग्ण विषाणूचा नवा प्रकार बी. १.१.७ मुळे अधिक बाधित झाले आहेत. विषाणूच्या नवा प्रकाराचा लहान मुलांनाही लवकर संसर्ग होत आहे, असे डॉ. जस्टिन स्क्रिंस्की यांनी सांगितले.










