नवी दिल्ली – जगभरात लसीकरणाने वेग घेतल्याने अनेक देशात कोरोनाचा धोका कमी होईल, असे वाटत असतानाच आता पुन्हा एकदा संपूर्ण युरोपसह अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि रशिया तसेच आशियातील काही देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य तज्ज्ञांची चिंता वाढली आहे, असे मत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) व्यक्त केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने असा इशारा दिला आहे की, गेल्या महिनाभरापासून युरोपमध्ये कोविडचा विळखा आणखी वाढत आहे. तसेच आता हिवाळ्यात येथे मृतांची संख्या सुमारे २२ लाखांपेक्षा जास्त असू शकते. इतकेच नव्हे तर येत्या काही महिन्यांत सुमारे ७ लाख कोरोना बाधितांचा मृत्यू होऊ शकतो, सहाजिकच संपूर्ण युरोपमध्ये प्रकरणे वाढत असल्याने काही देशांत कठोर निर्बंध लादण्यात येत आहेत.
संघटनेने असाही अंदाज लावला आहे की, १ डिसेंबर २०२१ ते १ मार्च २०२२ दरम्यान ५३ पैकी ४९ देशांमध्ये अतिदक्षता विभागात गंभीर रुग्ण दिसू शकतात. याशिवाय एकूण मृतांचा आकडा २२लाखांवर पोहोचू शकतो. सध्या कोरोनामुळे मृतांचा आकडा १५ लाखांच्या वर आहे. संघटनेच्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात कोरोनामुळे मृत्यूची संख्या दररोज सुमारे ४,२०० पर्यंत वाढली, सप्टेंबरच्या अखेरीस एका दिवसात २,१०० मृत्यू नोंदवले गेले आणि आता हा आकडा दुप्पट झाला आहे. विशेष म्हणजे जर्मनीमध्ये लशीकरण केलेल्या नागरिकांना देखील व्हायरसचा संसर्ग होत आहे.
संघटनेचे युरोप प्रादेशिक संचालक हॅन्स क्लुगे म्हणाले की, युरोप आणि मध्य आशियातील कोविड-१९ ची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. आव्हानात्मक परिस्थिती सामना करावा लागत आहे. तसेच त्यांनी आणखी कडक नियमांची मागणी केली, ज्यामध्ये लशीकरण, सामाजिक अंतर, फेस मास्कचा वापर आणि हात धुणे यांचा समावेश आहे.
जर्मनीच्या आरोग्यमंत्र्यांनी कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी अधिक निर्बंध लादण्याचे संकेत दिले आहेत. देशातील संसर्ग दर विक्रमी उच्चांकावर पोहोचला आणि अमेरिकेनेही जर्मनीला जाण्याचा सल्ला दिला. जर्मनीच्या चौथ्या लाटेला रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी बंदी घालण्याचे आवाहन केले.