सिडनी – कोरोना विषाणूचा फैलाव चीनमधून संपूर्ण जगात झाल्याचा दावा अमेरिकेसह अनेक देशांनी केला आहे. त्याआधारे चीनला लक्ष्य करण्यात आले. परंतु कोरोना विषाणूला जगभरात पसरविण्यासाठी चीनने अनेक वर्षांपासून रणनीती बनविल्याचा दावा ऑस्ट्रेलियाच्या प्रसार माध्यमाकडून करण्यात आला आहे. चीन २०१५ पासून कोरोना विषाणूवर (सार्स) संशोधन करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु कोरोना विषाणू नेमका कुठून आला याबाबत अद्याप पुष्टी झालेली नसली तरी चीनच्या वुहानकडे बोट दाखविले जात आहे.
काही वर्षांपासून चीन कोरोना विषाणूवर संशोधन करत असल्याचा दावा ‘द वीकेंड ऑस्ट्रेलियन’ या वृत्तपत्रातील एका लेखात करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा वापर जैविक अस्त्राच्या रूपात करण्याचा चीनचा विचार होता. त्यात चिनी संशोधकांच्या एका प्रबंधाचा हवाला देण्यात आला आहे.
चीन २०१५ पासून सार्स विषाणूच्या मदतीने जैविक अस्त्र बनविण्याचा प्रयत्न करत होता. “सार्स विषाणूचे अनैसर्गिक उगमस्थान आणि मानवनिर्मित विषाणूंच्या नव्या पेशींचा जैविक अस्त्र म्हणून वापर”, असे या प्रबंधाचे शीर्षक आहे. तिसरे महायुद्ध मोठमोठ्या शस्त्रांद्वारे नव्हे, तर जैविक अस्त्राच्याच माध्यमातून होईल, असे प्रबंधात सूचित करण्यात आले आहे. ‘द वीकेंड ऑस्ट्रेलियन’ चे हे वृत्त news.com.au. या संकेतस्थळाने दिले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या व्हयूहात्मक धोरण संस्थेचे कार्यकारी संचालक पीटर जेनिंग्स यांनी news.com.au. ला प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रबंध म्हणजे चीनच्या कारस्थानाचा भक्कम पुरावा ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या विविध स्ट्रेनचा वापर सैनिकांच्या रूपाने करण्याचा विचार चिनी वैज्ञानिकांचा होता. त्याचा फैलाव कसा करावा याचाही विचार सुरू होता. कोरोना विषाणू सध्या संपूर्ण जगात थैमान घालत आहे. त्याचा सर्वात कमी परिणाम चीनवर झाला आहे.