नवी दिल्ली – कोविड महामारीला रोखण्यासाठी सध्या जगभरात कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी यासाठी अनेक देश विविध ऑफर्स देत असून प्रोत्साहन देत आहेत. ऑस्ट्रेलियामधील अशाच एका बातमीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. एका महिलेने लस घेतल्यानंतर तिचे नशीब चांगलेच फळफळले. लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली लॉटरीची सोडत जिंकून ही महिला कोट्याधीश बनली आहे.
डेली मेल ऑस्ट्रेलियाच्या वृत्तानुसार, २५ वर्षीय जोआन झू हिने गेल्या महिन्यात एक मिलियन डॉलर व्हॅक्सिन लॉटरीमध्ये सहभाग घेतला होता. लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी २० सामाजिक संस्था आणि महापालिका यांच्या समुहातर्फे लॉटरी सोडतीची स्थापना केली होती. यामध्ये ३६०० पोस्टकोडच्या माध्यमातून जवळपास २७,४४,९७४ ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांनी लशीसाठी नोंदणी कली होती. सोडतीमध्ये सहभाग घेण्यार्या नागरिकांना ३१ ऑक्टोबरपर्यंत कोविडविरोधी लशीचा कमीत कमी एक डोस घेतला होता.
या सोडतीत लाखो नागरिकांमध्ये जोआन झू रातोरात कोट्यधीश झाली. ती या सोडतीत AU $ 1 million किंवा ५.४ कोटी रुपयांची लॉटरी जिंकली. आपले नशीब बदलून टाकणार्या या घटनेवर झू हिचा अद्याप विश्वास बसत नाहीये. झू हिने डेलीला सांगितले की, कोणीतरी मला दुसर्या दिवशी फोन केला. मला वाटते की तो शुक्रवारचा दिवस होता. मी कामावर गेले होते. मी फोन उचलू शकले नाही. मी त्यांना परत फोन केला तेव्हा ते म्हणाले की, तुम्ही एक मिलियन डॉलर जिंकले आहेत! ऑस्ट्रेलियातील तुम्ही एकमेव आहात!
ऑक्टोबरच्या सुरुवातीला सोडत सुरू झाल्यानंतर मिलियन डॉलर व्हॅक्सिनचे संकेतस्थळ क्रॅश झाले होते. आधी २४ तासात ३,५०,००० प्रवेश झाले होते. या ऑस्ट्रेलियाई लॉटरीत ३१०० हून अधिक भाग्यवान विजेत्यांना $ 4.1 लाखांहून अधिक किमतींचे बक्षीसे देण्यात आली.