नवी दिल्ली – कोरोना प्रतिबंधित लस घेतल्याने कोरोनापासून बचाव होत असल्याने लसीकरण करून घेणे हाच पर्याय आहे, असा निष्कर्ष बहुतांश सगळ्याच संशोधनातून निघत आहे. पंजाब सरकारकडूनही पोलिस कर्मचार्यांवर असेच संशोधन करण्यात आले. त्यांचा निष्कर्षही तोच आहे. त्यामुळे ज्यांना कोरोना लशीबाबत साशंकता आहे, अशांनी लसीकरण करून घेणे अत्यावश्यक आहे.
कोरोना लशीचे दोन्ही डोस मृत्यूचा धोका ९८ टक्क्यांनी कमी करतात. तर एक डोस जवळपास ९२ टक्के संरक्षण करतो. पंजबामधील पोलिसांवर केलेल्या संशोधनावरून सरकारने ही माहिती दिली. चंडीगड येथील पदव्योत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था आणि पंजाब सरकारतर्फे पोलिसांवर हे संशोधन करण्यात आले.
नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी संशोधनातील आकडेवारी पत्रकार परिषदेत दिली. लस न दिलेल्या ४,८६८ पोलिस कर्मचार्यांपैकी १५ जणांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. प्रतिहजार रुग्णांच्या तुलनेत हा आकडा ३.०८ रुग्ण आहे. लशीचा पहिला डोस घेतलेल्या ३५,८५६ पोलिस कर्मचार्यांपैकी ९ जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा प्रतिहजार ०.२५ आहे. लशीचे दोन डोस घेणार्या एकूण ४२,७२० पोलिस कर्मचार्यांपैकी दोघांचाच मृत्यू झाला. तो प्रतिहजार ०.०५ रुग्णांच्या बरोबर आहे.
पोलिस कर्मचारी उच्च जोखिमेच्या समुहात येतात. या आकडेवारीवरून कोरोनाप्रतिबंधित लशीचा एक डोस मृत्यूपासून ९२ टक्के संरक्षण देतो. तर दोन्ही डोस ९८ टक्के संरक्षण करतात, असे निदर्शनास आले आहे. गंभीर संसर्ग आणि मृत्यू रोखण्यासाठी लसीकरण हाच उपाय आहे, हे असे संशोधन आणि त्यांच्या निष्कर्षावरून सिद्ध होते. त्यामुळे कोरोना प्रतिबंधित लस प्रभावी असून, त्यावर विश्वास ठेवून त्या घ्याव्यात, असे आवाहन डॉ. पॉल यांनी केले आहे.
झायडस कॅडिला
डॉ. पॉल सांगतात, जायकोव्ह-डी लशीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी द्यावी, अशा मागणीचा अर्ज जायडस कॅडिला कंपनीने भारताच्या औषध महानियंत्रकांकडे केला आहे. तज्ज्ञ समिती त्यांच्या आकडेवारीचे मूल्यांकन करत आहे. त्यावर निर्णय होणे अपेक्षित आहे.
जॉन्सनसोबत चर्चा
अमेरिकेची औषधनिर्माती कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीच्या एका डोसच्या वापराबद्दल कंपनीसोबत चर्चा सुरू आहे. हैदराबाद येथील बायो ई कंपनीकडून या लशीचे उत्पादन होणार आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटसह इतर स्ट्रेनविरोधात ही लस भक्कमरित्या संरक्षण करते, असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे.