नवी दिल्ली – कोरोना विषाणूशी दोन हात करताना देशभरात लसीकरणावर भर दिला जात आहे. तरीही अनेक नागरिक लस घेण्यास संकोच करत आहेत. अशा नागरिकांना कोरोना संक्रमणाचा धोका कायम राहण्याची शक्यता आहे. एका नव्या संशोधनात याबद्दल इशारा देण्यात आला आहे. संशोधनानुसार, कोरोना संक्रमाणानंतर शरीरात रोगप्रतिकारक शक्ती कमी दिवस टिकते. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर कोणतीही लस घेतली नाही तर दुसर्यांदा संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो. तसेच, वारंवार संसर्ग होण्याचा धोकाही मोठा असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
या संशोधनात अमेरिकेच्या येल स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे प्राध्यापक जेफरी टाउनसेंड यांनी सहभाग घेतला. ते सांगतात, तीन महिने किंवा त्यापेक्षाही कमी कालावधीत दुसर्यांदा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे संक्रमित झालेल्या नागरिकांनीही लस घेणे आवश्यक आहे. पूर्वी झालेल्या संसर्गामुळे तयार झालेली रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी काळ टिकते. दुसर्यांदा बाधित झालेल्या रुग्णांचे नमुने तसेच रोगप्रतिकारक शक्तीसंदर्भातील डाटाचे विश्लेषण केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
टाउंनसेंड सांगतात, की कोरोनाचे अनेक नवे व्हेरिएंट आढळले आहेत. त्यापैकी काही खूपच संक्रामक आहेत. त्यामुळे पूर्वी झालेल्या संसर्गापासून तयार झालेली रोगप्रतिकारक शक्ती नव्या संसर्गापासून बचावसाठी खूपच कमी प्रभावी ठरत आहे. याचाच अर्थ कोरोना महामारीच्या सुरुवातीला बाधित झालेल्या नागरिकांनी लस घेतली नाही तर आगामी काळात ते पुन्हा विषाणूच्या कवेत येऊ शकतात.
जगभरात आतापर्यंत कोरोनाचे २३.५३ कोटी रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४८ लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे अमेरिका सर्वाधिक प्रभावित झाला आहे. तेथे आतापर्यंत चार कोटी ३८ लाख रुग्ण आढळले आहेत. तर सात लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात तीन लाख ३८ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.