बोस्टन (अमेरिका) – कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लशीचे संशोधन झाले. जगभरात लसीकरणाला सुरुवातही झाली. परंतु लस घेतल्यानंतर माणसाचा मृत्यू रोखता येऊ शकतो, संसर्ग टाळता येत नाही. संसर्ग झाला तरी त्याची सौम्य लक्षणे दिसतात हे सिद्ध झाले आहे. कोरोना विषाणूही आपले रूप बदलत असून कालांतराने वेगवेगळ्या रुपात समोर येत आहे. तरी लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे.
लशीवरही विविध संशोधन होत असून त्यावर वेगवेगळे निष्कर्ष काढले जात आहेत. आता हेच पाहा ना आपल्या शरीरारत दुपारी अँटीबॉडीजची पातळी अधिक असल्याने सकाळच्या तुलनेत दुपारी घेतलेली लस अधिक परिणामकारक असते, असा निष्कर्ष नुकताच संशोधकांनी काढला आहे. बायोलॉजिकल रिदम नावाच्या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार, २४ तासांत शरीरात अनेक प्रकारचे बदल होत असतात. यामध्ये संक्रामक आजारांविरुद्ध प्रतिक्रिया आणि लसीकरणाचाही समावेश होतो.
अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्स सामान्य रुग्णालयाशी संबंधित आणि संशोधनातील वरिष्ठ लेखिका एलिजाबेथ क्लेरमॅन यांच्या माहितीनुसार, वेगवेगळ्या वेळेत कोविड लशीची प्रतिक्रिया वेगवेगळी असते, असा पुरावा आमच्या विश्लेषणात्मक संशोधनाने उपलब्ध करून दिला आहे. हे संशोधन लशीचा प्रभाव किती वेळ असू शकतो हे पाहण्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल.
संशोधकांना असे आढळले की, रोगाचे लक्षण आणि औषधांची प्रतिक्रिया दिवसाच्या वेळेत भिन्न असतात. उदाहरणार्थ, फुफ्पुसांच्या आजाराने पीडितांना दिवसाच्या एका निश्चित वेळेला जास्त त्रास होत असतो. संशोधकांनुसार, एन्फ्लुएंजा लस घेणार्या ज्येष्ठ पुरुषांवर करण्यात आलेल्या संशोधनात ज्येष्ठांमध्ये सकाळी लस दिल्यावर दुपारच्या तुलनेत त्यांच्यात अँटिबॉडीजची पातळी कमी आढळली होती.
नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, ब्रिटेनमध्ये २१९० आरोग्य कर्मचार्यांवर कोविड लसीकरणाचे परीक्षण करण्यात आले. संशोधकांनी लसीकरणाच्या दिवसाची वेळ, लशीचा प्रकार, वय, लिंग आणि लसीकरणानंतरच्या दिवसांची संख्येच्या आधारावर नागारिकांमध्ये विकसित झालेल्या अँटिबॉडीजच्या पातळीवर होणार्या परिणामकारकतेच्या तपासणीसाठी एक मॉडेल तयार केले. ज्यांनी दुपारी लस घेतली, त्यांच्यामध्ये अँटिबॉडीच्या प्रतिक्रिया सामान्यपेक्षा जास्त असल्याचे आढळले.