नवी दिल्ली – देशात डिसेंबरअखेरपर्यंत शंभर कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधित लस देण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट असून, या पार्श्वभूमीवर सरकारकडून लस घेण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. विविध योजना, बक्षिसांच्या माध्यमातून नागरिकांना आकर्षित करण्यात येत आहे.
याच उपाययोजनांचा भाग म्हणून केंद्राने लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी साप्ताहिक किंवा मासिक सोडती (लकी ड्रॉ) सह अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. लकी ड्रॉमध्ये स्वयंपाकघरातील उपकरणे, धान्याचे किट, प्रवासाचा पास, रोख रकमेसारख्या बक्षिसांची लयलूट करण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने इतर उपाययोजनाही केल्या आहेत. त्यामध्ये कामाच्या ठिकाणी लसीकरण आणि दोन डोस घेतलेल्या नागरिकांना पदक प्रदान करणे याचा समावेश आहे. या पदकांवर ‘मी पूर्ण लसीकरण करवून घेतले आहे. तुम्ही पूर्ण लसीकरण केले आहे का’? असे लिहिलेले असेल.
देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या सर्व उपाययोजनांबद्दल सल्ला देऊ शकतात. तसेच जिल्हा आणि गावपातळीवरील दोन्ही डोस घेतलेल्या प्रतिष्ठीत नागरिकांचा यामध्ये समावेश करण्याचे नियोजन आहे. अधिकार्यांच्या माहितीनुसार, देशातील ८२ टक्के लोकसंख्येला कोरोनाचा पहिला डोस आणि ४३ टक्के नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. परंतु देशातील १२ कोटी नागरिक असे आहेत ज्यांनी, पहिला डोस घेतला पण दुसरा डोस घेतलेला नाही. तसेच त्यांच्या दोन्ही डोसमधील निर्धारित काळही उलटून गेला आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत नेपाळ, ताजिकिस्तान आणि मोझांबिक या देशांना कोविशिल्ड लशीचे ५० लाख डोस निर्यात करण्यास केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला परवानगी दिली आहे. या देशांशिवाय कोव्हॅक्सअंतर्गत बांगलादेशला सुद्धा कोविशिल्डची निर्यात केली जाणार आहे.








