नवी दिल्ली – ‘कोरोना आणि कोरोना’ एका शब्दाने गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण विश्वाला हादरवून सोडले आहे. जगातील बहुतेक देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जास्त होत असताना त्यावर नियंत्रण आणण्यासाठी अनेक संशोधक प्रयत्न करीत होते, अखेर त्यावर प्रतिबंध म्हणून लस शोधण्यात आली आणि या लशीचे दोन डोस अनेक देशांमध्ये देण्यात येत आहेत. परंतु अद्यापही काही देशांमध्ये या लशींचे पहिले डोस देखील पूर्ण झालेली नसून काही देशांमध्ये मात्र पहिले डोस पूर्ण होऊन दुसरा डोस देखील देण्यात येत आहे.
भारतात देखील सुमारे निम्म्या लोकसंख्येला कोरोनाचे डोस मिळालेले आहेत, परंतु जगातील काही देश असे आहेत की, तेथे अद्यापही कोरोनाचा एक डोस देखील मिळण्याची कमतरता दिसून येते मात्र इस्रायल हा एकमेव असा देश आहे की, त्यांनी यात आघाडी घेतली असून पहिला, दुसरा इतकेच नव्हे तर तिसरा डोस देखील पूर्ण झाला असून आता तेथे चौथा डोस देण्याची या देशाची तयारी आहे.
जगातील अनेक देश अजूनही कोविड लशीच्या कमतरतेशी झगडत आहेत. दरम्यान, इस्रायल हा जगातील पहिला देश बनू शकतो, जिथे लवकरच कोविडची चौथी लस दिली जाईल. इस्रायल आता कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराचा सामना करण्यासाठी कोविड लशीच्या चौथ्या डोसचा विचार करत आहे. येथे आरोग्य कर्मचारी, 60 वर्षांवरील नागरिक किंवा कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या नागरिकांना कोविड लशीची चौथी मात्रा दिली जाऊ शकते.
देशात लशीकरण वाढवणे हा देखील त्याचा एक उद्देश आहे. इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने स्थापन केलेल्या तज्ज्ञांच्या एका पॅनेलने आपल्या शिफारसी सादर केल्या. ज्यांना चार महिने जुनी कोविड लसीची तिसरी लस देण्यात आली आहे, त्यांना चौथी लस द्यावी, असे पॅनेलने सुचवले आहे. मात्र, या शिफारशींची अंमलबजावणी होणे अद्याप बाकी आहे.
दरम्यान, पंतप्रधान नॅफ्थली बेनेट, यांनी इस्रायलला पाचव्या लाटेचा सामना करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांचे लशीकरण करण्याचे आवाहन केले आहे, तसेच त्यांनी पॅनेलच्या सूचनांचे स्वागत केले आहे. तसेच पॅनेलने असेही सुचवले आहे की, दुसऱ्या आणि तिसऱ्या लशीमधील अंतर सध्याच्या पाच महिन्यांवरून तीन महिन्यांपर्यंत कमी करावे.
पॅनेलच्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या पाचव्या लाटेला तोंड देण्यासाठी हे उपाय प्रभावी ठरतील. पॅनेलवरील डॉक्टर अर्नॉन शॉअर म्हणाले, “आम्ही ओमिक्रॉन संसर्गापासून संरक्षणात घट होण्याची पाहत आहोत. कारण या लाटेमध्ये संसर्गाची प्रकरणे आश्चर्यकारक पटीने वाढत आहेत. इस्रायलमधील 62 टक्के नागरिकांना आतापर्यंत कोविडच्या दोन्ही लशी मिळाल्या आहेत. ओमिक्रॉन प्रकार रोखण्यासाठी, येथील सरकारने 25 नोव्हेंबर रोजी परदेशी प्रवाशांना इस्रायलमध्ये येण्यावर त्वरीत बंदी घातली.
सरकारने उच्च धोका असलेल्या देशांची यादी जारी केली असून तेथे न जाण्याचे किंवा न येण्याचे आवाहन केले. या आठवड्यात अमेरिकेचाही यात समावेश करण्यात आला आहे. इस्रायल मधील एका रुग्णालयाने सांगितले की पहिला मृत्यू ओमिक्रॉन प्रकारामुळे झाला आहे. तर आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की इस्रायलमध्ये ओमिक्रॉन प्रकाराच्या संसर्गाची किमान 340 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्याचबरोबर सरकारी कार्यालयात निम्म्या कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलावण्याची परवानगी पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.