नवी दिल्ली – कोरोना लस घेतल्यानंतर आपण किती दिवस सुरक्षित राहू शकतो हा प्रश्न साधारण प्रत्येक लस घेणाऱ्या व्यक्तिला पडतोच. परंतु या प्रश्नाचे उत्तर तज्ज्ञांकडेसुद्धा नाहीये. कोरोना लशीचा डोस घेणार्या लोकांचे परीक्षण करून त्यांच्यावर लशीचा प्रभाव किती दिवस राहू शकतो याचा अभ्यास सुरू आहे.
तसेच आणखी काही डोसची गरज लागणार का, ती केव्हा लागणार, याबाबतही अनिश्चितता आहे. लशींवर अभ्यास करून तसेच लोकांचे परीक्षण करूनच याबाबत माहिती मिळू शकेल, असे वॉशिंग्टन येथील विद्यापीठाचे लस संशोधक डेबोराह फुलर यांनी सांगितले.
लस घेतल्यानंतर तिचा प्रभाव लोकांवर किती वेळ टिकू शकेल. त्यानंतर लोक पुन्हा संसर्ग होण्याच्या कक्षेत केव्हा येतील, हा सगळा अभ्यासाचा भाग आहे. दोन डोसचा प्रभाव किमान ६ महिने तरी राहतो, असे अमेरिकी लस फायझरबाबत आढळले आहे. कोरोना लशीचा डोस घेतल्यानंतर काही आणखी कालावधीपर्यंत कोरोनाची भीती जाऊ शकते. मॉडर्ना लस घेतल्यानंतर सहा महिन्यांच्याही पुढे कोरोना होण्याचा धोका नाही, असा दावा केला जात आहे.
मॉडर्ना लशीपासून तयार होणार्या अँटीबॉडी शरीरात सहा महिन्यांपर्यंत राहू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच कोरोनाचा प्रभाव आपल्यावर किती काळ राहणार हे अँटीबॉडीशिवाय आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती किती आहे, यावरही अवलंबून आहे.
चांगली रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तिला दुसर्यांदा कोरोनाची बाधा झाल्यास तो लवकर पुन्हा बरा होऊ शकतो. असे लोक कोरोनाला पूर्णपणे मात देत नसले तरी संसर्गाची घातकता कमी करू शकतात. सध्या जी लस उपलब्ध आहे, तिचा प्रभाव कमीत कमी एका वर्षापर्यंत राहू शकतो, असे युनिव्हर्सिटी ऑफ मॅरीलँड स्कूल ऑफ मेडिसिनमधील लसतज्ज्ञांनी सांगितले.