भोपाळ (मध्य प्रदेश) – पती-पत्नीमध्ये कोणत्या मुद्यावरून भांडण होईल, याचा काही नेम नाही. अनेक छोट्या छोट्या मुद्यांवरून होणारी भांडणे घटस्फोटापर्यंत पोहोचता. कुटुंब न्यायालयात त्याची अनेक उदाहरण बघायला मिळतील. भोपाळमध्येही असाच एक आगळावेगळा वाद पुढे आला. मी सांगतो तीच लस घ्यायची, असा दम नवऱ्याने बायकोला दिला आणि त्यावरून झालेला वाद थेट न्यायालयात पोहोचला.
मुळात या नवरोबांनी कोवॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले. बायकोचे लसीकरण होणे बाकी होते. ज्यावेळी बायको लस घ्यायला निघाली तेव्हा कळले की, आता कोवॅक्सिन उपलब्ध नाही, कोविशिल्ड घ्यावी लागेल. बायको तयार तर झाली, पण नवऱ्याचा आग्रह होता की ‘मी कोवॅक्सिन घेतले आहे त्यामुळे तू देखील तीच लस घ्यायची.’
सुरुवातीला वाटणारे छोटेसे भांडण मोठ्या वादात रुपांतरीत झाले आणि दोघेही न्यायालयात पोहोचले. कुटुंब न्यायालयाने दोघांची समजूत काढली. आणि पत्नीला कोणतीही लस दिली तरीही चालेल, यावर पतीचे मन तयार केले. त्याचवेळी पत्नीला देखील कोविशिल्डचे दोन्ही डोस घेण्यासाठी तयार केले. दोघांनाही समजावून सांगताना कुटुंब न्यायालयाची मात्र चांगलीच दमछाक झाली.
चार महिन्यांपूर्वी कुटुंब पॉझिटिव्ह
चार महिन्यांपूर्वी यांचे संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यातून बाहेर पडल्यावर पतीने लस घेण्यासाठी स्लॉट बुक केला. पतीने पहिले लस घेतली. नंतर पत्नी तयार झाली तर कोविशिल्ड उपलब्ध होती. त्यावर पती देव नाराज झाले आणि एवढा मोठा वाद निर्माण केला.
पाचवेळा समुपदेशन
पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर एकमेकांशी बोलणे त्यांनी बंद केले. त्यानंतर पत्नीने समुपदेशकाला संपर्क केला. त्याने दोन्ही लस प्रभावी असल्याचे सांगितले. पण दोघेही समजायला तयार नव्हते. दोघांना समजावून सांगण्यासाठी तब्बल ५ वेळा समुपदेशन करावे लागले.