मुंबई – देशासह भारतात साधारणत: मागच्या दोन वर्षांपासून कोरोना अर्थातच कोव्हीड 19 या विषाणूने धुमाकूळ घातला असून अनेकांना त्याची लागण झाली, तर अनेकांना आपले आप्तस्वकीय या लाटेत गमवावे लागले आहेत. मात्र कोरोनावरची लस आल्यापासून त्यावर काही दिलासा मिळत आहे. असे असले तरी अनेकांना या लशींबद्दल अजूनही शंका असून त्या किती टक्के प्रभावी आहेत, असा प्रश्न उपस्थित होत असतो. काही लस या 60 टक्के तर काही त्यापेक्षाही जास्त प्रभावी असल्याचा दावा संबंधित कंपन्यां आणि वैज्ञानिकांनी केला आहे. दावे काहीही असले तरी कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी ही लस जास्त प्रभावी होत असल्याचे अनुभव आहे. मात्र एका अभ्यासानुसार कोरोनावरची लस ही काही लोकांमध्ये इतरांपेक्षा जरा जास्तच प्रभावी होत असून त्यापासून त्यांना जास्तीचे संरक्षण मिळणार आहे.
कदाचित हे ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही, पण एखाद्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात कोरोना लसीकरणानंतर जितक्या अॅँटीबॉडी तयार होतात, त्यापेक्षा कितीतरी जास्त अॅँटीबॉडी या मधूमेहाची व्याधी असलेल्या व्यक्तीच्या शरीरात तयार होत आहे. दहा पैकी आठ मधुमेहींमध्ये कोरोनावरची ही लस सामान्य लोकांच्या तुलनेत प्रभावी ठरल्याचे सिद्ध होत आहे. दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजच्या वैद्यकीय चमूने केलेल्या सर्व्हेक्षणातून ही गोष्ट पुढे आली आहे. दिल्लीच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले.
त्यानुसार कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सिन लशीची मात्रांच्या प्रभाव किती पडतो त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात असे आढळले की मधुमेही रुग्णांमध्ये लसीकरणाआधी 83. 70 टक्के सीरो पॉझिटीव्हीटी किंवा अॅँटीबॉडी आढळल्या. मात्र लसीकरणानंतर त्यांचे प्रमाण 95.10 टक्के पहिल्या लशीनंतर आणि 94. 80 टक्के दुसºया लशीनंतर असे वाढलेले आढळून आले. निरोगी व्यक्तींच्या तुलनेत या लस मधुमेहींमध्ये जास्त प्रभावी ठरल्याचे दिसले. येथील एक डॉक्टर म्हणाल्या की मधुमेहींमध्ये कोरोना लसीकरणाचा चांगला प्रभाव आहे. मधुमेही-डायबेटीसचे रूग्ण हे सामान्य माणसांपेक्षा कोरोनासारख्या विषाणूजन्य आजाराला अधिक संवेदनशील असतात, त्यामुळे त्यांना कोरोना लागण होण्याची आणि त्यातून गंभीर स्थिती होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून प्रत्येकाने लस घेतली पाहिजेच पण मधुमेह आणि इतर सहव्याधी असलेल्यांनी ती प्राधान्याने घ्यायला हवी. त्यातही मधूमेहींनी तर तातडीने लस घ्यायलाच हवी.
आपण ही बातमी वाचत असाल आणि आपल्यापैकी जे कोणी मधुमेही असतील किंवा तुमचे आप्तस्वकीय मधुमेही असतील, तर तुम्ही तातडीने कोरोना लस घेणे आवश्यक आहे. शेवटी सावधानता बाळगूनच संकटावर मात करता येते नाही का?