नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना विषाणूविरुद्ध सुरू असलेल्या लसीकरणात तांत्रिक सल्लागार समूहाने कोविशिल्ड लशीचा दुसरा डोस ८ ते १६ आठवड्यांच्यादरम्यान घेण्याची शिफारस केली आहे. सध्या या लशीचा डोस १२ ते १६ आठवड्यांदरम्यान दिला जात आहे. एनटागीने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याबद्दल कोणतीही शिफारस केली नाही. कोव्हॅक्सिन लशीचा दुसरा डोस २८ दिवसांनंतर दिला जात आहे. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतराची शिफारस लागू होणार आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जागतिक आकडेवारी आणि वैज्ञानिकांच्या पुरव्याच्या आधारावर कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतराबाबत बदल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. आठ ते सोळा आठवड्यांदरम्यान दुसरा डोस घेतल्यानंतरची अँटिबॉडीजची पातळी ही १२ ते १६ आठवड्यादरम्यान घेतलेल्या दुसऱ्या डोसच्या अँटिबॉडीजच्या पातळीच्या समानच असेल. बहुतांश नागरिकांनी कोविशिल्डचा डोस घेतल्याने ही शिफारस लागू केल्यानंतर दुसरा डोस वेगाने घेतला जाईल.
सुरुवातीला कोविशिल्डची दोन डोसमधील अंतर सहा ते आठ आठवडे निश्चित करण्यात आले होते. म्हणजेच पहिला डोस घेतल्याच्या दिवसापासून सहा ते आठ आठवड्यांच्या आत दुसरा डोस घेणे आवश्यक होते. एनटागीच्या शिफारशीवर गेल्या वर्षी १३ मे रोजी अंतर वाढवून १२ ते १६ आठवडे इतके अंतर निश्चित करण्यात आले होते.
औषधे महानियंत्रकांनी (जीजीसीआय) कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लशी काही अटी-शर्तीसह वयस्कांसाठी बाजारात उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली आहे. परंतु लस सध्या बाजारात मिळणार नाही. सध्या डॉक्टरांचे क्लिनिक आणि नर्सिंग होम डीजीसीआयच्या अटी पूर्ण करू शकतात. त्यामुळे लस औषधांच्या दुकानात मिळणार नाही.
डॉक्टरांचे क्लिनिक किंवा नर्सिंगहोममधून खरेदी करून लस घेतली जाऊ शकते. त्यासाठी लशीचा संपूर्ण तपशील ठेवणे आवश्यक आहे. या परवानगीनंतर डॉक्टरांचे क्लिनिक आणि नर्सिंगहोममध्ये कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डचा एक डोस २७५ रुपयांना मिळणार आहे. लस देण्याचे सेवा शुल्क १५० रुपये असेल. या हिशेबावरून लशीचा एक डोस ४२५ रुपयांमध्ये मिळणार आहे.