विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोना प्रतिबंधक लशीच्या दुष्परिणामांपेक्षा त्याच्यामुळे होणाऱ्या फायद्यांचे प्रमाण निश्चितच जास्त आहे, हे सिद्ध झालेले आहे. लस घेतल्यानंतर ह्रदयावर सूज येत असल्याची तक्रार करणाऱ्या घटनांचा सध्या तज्ज्ञांची एक टीम संशोधन करीत आहे. हे संशोधन करीत असताना त्यांनी कुठेही लस धोकादायक असल्याचे म्हटलेले नाही. उलट संक्रमण रोखण्यासाठी किंवा नियंत्रण मिळविण्यासाठी लस हाच एकमेव पर्याय आहे, असेच ते म्हणत आहेत.
फायझर आणि मोडर्ना लस घेणाऱ्या काही लोकांमध्ये मायोकार्डायटीस आणि पेरीकार्डायटीसची प्रकरणे पुढे आली आहे. खरे तर या दोन्ही लशी mRNA तंत्रानुसार तयार झाल्या आहेत. मायोकार्डायटीसचा अर्थ ह्रदयाच्या मसल्सवर येणारी सूज आणि पेरीकार्डायटीस म्हणजे ह्रदयाच्या आजुबाजुला येणारी सूज होय.
जागतिक आरोग्य संघटनेने लशींची सुरक्षितता तपासण्यासाठी नेमलेली समिती म्हणते की मायोकार्डायटीससारखी प्रकरणे उपचार करून बरी होऊ शकतात. ११ जून २०२१ पर्यंत लशीचा दुसरा डोस घेणाऱ्या १० लाख पुरुषांमध्ये ४० पुरुषांना मायोकार्डायटीस झाले आहे. तर ४ महिलांनाही हा त्रास आढळून आला आहे. ही आकडेवारी १२ ते २९ वर्षे वयोगटातील आहे.
तर ३० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये हे प्रमाण कमी आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर काही दिवसांनी ही प्रकरणे पुढे आली आहे, असे आरोग्य संघटनेने म्हटले आहे. अर्थात संयुक्त राष्ट्राच्या समितीनेही मायोकार्डायटीस आणि लस यांचा संबंध असल्याची शक्यता नाकारलेली नाही. यापूर्वी युरोपच्या मेडीसीन एजन्सीनेदेखील यासंदर्भात खुलासा केला होता. लस घेतल्यानंतर एखाद्याला छातीत दुखत असेल, श्वास लागत असेल तर त्यांनी तातडीने डॉक्टरांना दाखवायला हवे, असे आरोग्य संघटनेने सुचविले आहे.