लंडन – जगातील पहिली कोविड प्रतिबंधक लस ‘स्पुतनिक-व्ही’ संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यासंदर्भात ब्रिटनमधील माध्यमांनी खळबळ उडवून देणारे वृत्त प्रसारित केले आहे. त्यामुळे ब्रिन सरकारनेही तसा दावा आता केला आहे. लसीचा फॉर्म्युला रशियन गुप्तहेरांनी चोरल्याचा आरोप करण्यात येत आहे.
ब्रिटन निर्मित ऑक्सफोर्ड-एस्ट्राझेनेकाच्या कोरोना लशीची ब्लू प्रिंट रशियाच्या गुप्तहेरांनी चोरली. त्यांच्या मदतीने ‘स्पुतनिक-व्ही’ ही पहिली कोविड लस बनविण्यात आल्याची धक्कादायत बाब समोर आली आहे. ब्रिटनच्या सुरक्षा यंत्रणांनी तेथील मंत्र्यांना याबाबत माहिती दिली आहेत. त्यात म्हटले आहे की, हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे ठोस पुरावे आहेत. क्रेमलिनच्या गुप्तहेर एजंटांनी कोविड लशीची योजना चोरली आणि त्यानंतर स्वतःच लस तयार करण्यासाठी ही योजना वापरली.
‘द सन’ च्या अहवालानुसार, ब्लू प्रिंट आणि संवेदनशील कागदपत्रे रशियन गुप्तहेरानेच चोरली होती. सुरक्षा मंत्री डेमियन हिंड्स यांनी मात्र याबाबत स्पष्ट बोलण्यास नकार दिला, परंतु सायबर हल्ले वारंवार होत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. तर सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉस्कोचा एक गुप्तहेर वैयक्तिकरित्या ब्रिटनमध्ये लशीचे गुप्त डिझाईन चोरण्यासाठी गेला होता.
सूत्रांनी पुढे असेही सांगितले की, हॅकर्सनी ऑक्सफर्ड विद्यापीठावर मार्च २०२०च्या सुरुवातीला म्हणजेच ब्रिटिश शास्त्रज्ञांनी लशीसाठी संशोधन सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर सायबर हल्ले केले होते. ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेका यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लशीची पहिली मानवी चाचणी जाहीर केली होती, परंतु अचानक यात रशिया अनेक पावले पुढे गेला. त्यानंतर रशियाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जाहीर केले की, त्यांनी जगातील पहिली कोविड-१९ लस स्पुतनिक-व्ही बनवली आहे.