मुंबई – कोरोना लशीचा १०० कोटी डोसचा टप्पा ओलांडल्यानंतर आता या महामारीतून मुक्ती मिळेल असा आशेचा किरण दिसत असताना कोरोना विषाणू इतक्या लवकर आपला पिच्छा सोडणार नाही असे दिसत आहे. कारण डेल्टा व्हेरिएंटवर प्रतिबंधित लशीचा कोणताही परिणाम होताना दिसत नाहीये, असे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यामुळे संसर्ग नियंत्रणात आवश्य आला आहे, परंतु डेल्टा व्हेरिएंट अद्याप दुर्बळ झालेला नाही. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात संपूर्ण अँटिबॉडी विकसित झालेल्या असतील, तरीही त्याला कोरोनापासून सुरक्षेची हमी दिली जाऊ शकत नाही. त्या व्यक्तीला पुन्हा संसर्ग होऊ शकतो.
देशात पुनर्संक्रमण आणि लस घेतल्यानंतरही होणार्या संसर्गाविषयी शास्त्रज्ञांनी एक संशोधन केले. यादरम्यान रुग्णांच्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग करताना त्यांना डेल्टा व्हेरिएंट आढळला. तो वर्षभरानंतरही तितकाच आक्रमक राहू शकतो याचा अंदाज पूर्वी आलेला नव्हता. त्यामुळे जोपर्यंत डेल्टा व्हेरिएंट आपल्यामध्ये असेल, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची कल्पना केली जाऊ शकत नाही, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
पुण्यतील डी. व्हाय. पाटील विद्यापीठ, नवी दिल्लीतील आयजीआयबी आणि गाझियाबादमधील अॅकेडमी फॉर सायन्टिफिक अँड इनोव्हेटिव्ह बायोलॉजी या संस्थांच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. त्यांचे हे संशोधन एल्सेविअर मेडिकल या नियतकालिकेत प्रकाशित करण्यात आले आहे. आयजीआयबीचे डॉ. विनोद स्कारिया सांगतात, डेल्टा व्हेरिएंटमुळे कोरोना संसर्ग एकापेक्षा अधिक वेळा होऊ शकतो, असे म्हटले जाऊ शकतो.
प्रत्येक रुग्णाचे देखरेख आवश्यक
या संशोधनाच्या निष्कर्षानुसार, लस घेतल्यानंतरही कोरोनाची बाधा झाली तर अशा रुग्णांवर देखरेख ठेवणे आवश्यक आहे. कारण त्याच आधारावरून विषाणूच्या पुढील प्रतिक्रियेबाबत माहिती मिळू शकते. लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर जर कोणीही कोरोनाबाधित झाला, तर त्याला श्वास घेण्यास त्रास होण्यासारखी लक्षणे दिसू शकतात.
आकडेवारी काय सांगते
– १,०४,४४१ नमुन्यांची आतापर्यंत जिनोम सिक्वेंन्सिंग झाली
– ६०६९४ नमुन्यांचे लिंकेज करण्यास यश
– ६०६९४ पैकी ४०६८२ (६७ टक्के) नमुन्यांमध्ये कोरोनाचे गंभीर व्हेरिएंट आढळले
– ४०६८२ पैकी एकट्या डेल्टा व्हेरिएंट २५९६९ नमुन्यात आढळला
– डेल्टा व्हेरिएंटमध्ये आतापर्यंत २४ म्युटेशन झाले आहेत
– ५४४९ रुग्णांमध्ये डेल्टाचे दुसरे म्युटेशन आढळले आहेत
(इन्साकॉगच्या अहवालानुसार)