विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतर सुस्कारा सोडत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण, आता या लसीचा तिसरा डोसही घ्यावा लागणार असल्याचे समोर येत आहे. यासंदर्भात झालेल्या नव्या संशोधनातून ही बाब स्पष्ट होत आहे की, तिसऱ्या डोसची आवश्यकता राहणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरण सुरू असताना लसींचा परिणाम किती वेळ टिकणार यावर सध्या चर्चा सुरू आहे. एकदा लस घेतल्यानंतर अनेक वर्षे कोरोनाच्या गंभीर संक्रमणापासून बचाव होऊ शकतो, असा दावा लसीकरणाचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांनी केला आहे. परंतु संसर्ग रोखण्यासाठी एका वर्षानंतर एक बूस्टर डोस घेण्याची आवश्यकता आहे, असे त्यांचे मत आहे.
वैज्ञानिकांचा एक गट कोरोनाच्या सात लसींच्या क्लिनिकल ट्रायलच्या आकडेवारीवर अभ्यास करत आहे. लस घेतल्यानंतर शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता किती काळ टिकू शकते याचा शोध लावणे हा त्यामागचा उद्देश आहे, असे नेचरमध्ये प्रकाशित एका अहवालात म्हटले आहे.
संशोधनातील निष्कर्ष
१) लसीकरणाच्या एका वर्षानंतर न्यूट्रिलायजिंग अँटीबॉडी घटू शकतात. त्या वाढविण्यासाठी तसेच संसर्गापासून संरक्षणासाठी लसीचा एक बूस्टर डोस घेणे आवश्यक ठरेल.
२) बूस्टर डोस घेतल्याविनासुद्धा लसीकरणाचा अनेक वर्षांपर्यंत प्रभाव राहील. लस घेतल्यास कोरोनाच्या गंभीर संसर्गापासून संरक्षण होऊ शकेल. म्हणजेच एकदा लस घेतल्यानंतर संसर्ग झाला तरी तो खूपच सौम्य असेल.
३) एखाद्या व्यक्तीतील न्यूट्रिलायजिंग अँटीबॉडी कमी आढळल्या तरी कोरोना संसर्गापासून त्याचे संरक्षण होऊ शकेल.
४) एखाद्या लसीचा प्रभाव ५० टक्केच असेल. ती लस घेणाऱ्या व्यक्तीमध्ये कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तीच्या तुलनेत ८० टक्के कमी अँटीबॉ़डी तयार होतात. तरीसुद्धा कोरोनापासून बराच बचाव होऊ शकतो.
अँटीबॉडी अधिक
सहसंशोधक आणि सिडनी विद्यापीठातील मायक्रोबायोलॉजिस्ट जेम्स ट्राइक्स सांगतात, फायझर, मॉडर्नाची लस शरीरात अधिक अँटीबॉडी तयार करते. तर एस्ट्राजेनेकाच्या लसीमुळे कमी अँटीबॉडी तयार होतात. परंतु एका वर्षानंतर सर्वच लसींमुळे तयार झालेल्या अँटीबॉडी घटताना दिसतील. त्यासाठी अतिरिक्त बूस्टर डोसने त्यांना पुन्हा वाढवता येऊ शकते.
कमी अँटीबॉडी
जपानच्या योकोहामा सिटी विद्यापीठाच्या एका अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, ज्यांना कोरोनाची बाधा झाली, त्यांच्यामध्ये एका वर्षानंतर अँटीबॉडी आढळल्या. परंतु ज्यांना संसर्ग झाला पण लक्षणे दिसली नाही, अशा लोकांमध्ये कमी अँटीबॉडी आढळल्या. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्या लोकांनी बरे झाल्यानंतर त्वरित लस घेणे योग्य ठरेल.