नवी दिल्ली – देशात अठरा वर्षांवरील वयोगटासाठी लसीकरणाचा दरवाजा खुला झाल्यानंतर आणि खुल्या बाजारातही लसीच्या खरेदीची परवानगी दिल्यानंतर लस किती रुपयांमध्ये मिळणार यावर चर्चा सुरू झाली आहे.
आयात केलेल्या लसींची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ७५०-१५०० रुपये प्रतिडोस आहे. भारतात या लसींची किंमत कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आयात शुल्कात कपात करून आणि सबसिडी देऊन आयात केलेल्या लसींची किंमत ६०० -७०० रुपयांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. काही लसींची किंमत यापेक्षा अधिक असण्याचीही शक्यता आहे.
एकूणच दोन्ही लसींचे दोन्ही डोस घेण्यासाठी साधाराण एक हजार रुपयांहून अधिकचा खर्च येऊ शकतो. भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस खुल्या बाजारात जवळपास याच किमतीत उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे. सीरम इन्स्टिट्यूटनेसुद्धा खुल्या बाजारात कोविशिल्डची किंमत १००० रुपये प्रतिडोस असेल, असे सांगितले होते.
स्पुतनिक व्ही ची किंमत ७४० रुपये
इमर्जंन्सी यूज ऑथरायजेशनच्या अंतर्गत भारत बायोटेकने इतर देशांना कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा ११००-१५०० रुपये प्रतिडोसच्या किमतीनुसार केला आहे. रशियाच्या स्पुतनिक व्ही लसीच्या आयातीसाठी भारतातून डॉ. रेड्डी प्रयोगशाळेचे प्रयत्न सुरू आहेत. लशीच्या किमतीवर चर्चा सुरू असल्याचे प्रयोगशाळेकडून सांगण्यात आले. तसे पाहिले तर जागतिक बाजारात स्पुतनिक व्ही लसीची किंमत ७४० रुपये प्रतिडोस आहे.
आयातीला मंजुरी
जागतिक आरोग्य संघटनेने मंजूर केलेल्या अमेरिका, ब्रिटन आणि जापानच्या लसींच्या आयातीला केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात मंजुरी दिलेली आहे. परंतु त्या सर्व लसींची किंमत ७०० रुपये प्रतिडोस आहे. फायजर लसीची किंमत १४०० रुपये, माडर्नाची २३००-२७०० रुपये, सिनोवॅकची १००० रुपये प्रतिडोस तसेच जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीची किंमत ७३० रुपये प्रतिडोस आहे.
सध्या केंद्र सरकारकडून कोविशिल्ड १५० रुपये प्रतिडोस आणि कोव्हॅक्सिनचा २०६ रुपये प्रतिडोसप्रमाणे पुरवठा केला जात आहे. सरकारने १८ वर्षांवरील लोकांना लस देण्यास मंजुरी दिली आहे. परंतु देशातील लोकसंख्या पाहता ही गरज पूर्ण करण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात विविध लसींची आयात करावी लागणार आहे.