मुंबई – कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने नवीन शक्कल लढविली आहे. देशातील अनेक नागरिकांनी लशीचा एकच डोस घेतला आहे. दुसरा डोस घेऊन पूर्ण लसवंत होण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात आलेले आहे.
केंद्र सरकारने कोविन (CoWIN) पोर्टलवर आता एक नवीन सुविधा प्रदान केली आहे. लस घेतल्याच्या प्रमाणपत्रासह लसीकरणाची स्थिती प्रदर्शित करणारे एक चिन्ह दाखविले जाणार आहे. त्याला तुम्ही सोशल मीडियावरही शेअर करू शकतात. त्याशिवाय या अॅपच्या माध्यमातून तुम्ही लसीकरणासाठी वेळ घेऊ शकतात आणि लसीकरणाचे प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतात.
आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांच्या ट्विटनुसार, कोविन अॅपमध्ये वापरकर्त्याच्या कोविड लसीकरणाची स्थिती तसेच पूर्ण किंवा अंशिक लसीकरण झाल्याचे चिन्ह दिसणार आहे. हे चिन्ह ढालीसारखे दिसेल. लसीकरण प्रमाणपत्रासह हे चिन्ह डाउनलोड करून सोशल मीडियावर शेअर करता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला cowin.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल. तिथे नोंदणी केलेल्या मोबाइल नंबरद्वारे साइन इन केल्यास तुम्हाला शील्ड दिसेल. गरज वाटल्यास तुम्ही मोबाइल नंबरच्या सहाय्याने प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता आणि शेअर करू शकता.
कोविन प्लॅटफॉर्म ही सेवा संपूर्ण जगात मोफत देण्यास केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. जुलैमध्ये झालेल्या कोविन ग्लोबल कॉनक्लेव्ह दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविन प्लॅटफॉर्म मोफत उपलब्ध करून देण्यास पुढाकार घेतला होता. ते म्हणाले होते की, कोविन प्लॅटफॉर्म खुला करण्यात येणार आहे. लसीकरण सुरू करण्यासाठी कोणताही देश या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकणार आहे. हे अॅप लसीकरणाची वास्तविक वेळ आणि लसीकरण झाल्याची संख्या ट्रॅक करते.