नवी दिल्ली – लस घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठीच खुशखबर आहे. आता तुम्हाला हवी ती, हवी तेथे आणि हवे तेव्हा लस उपलब्ध होऊ शकणार आहे. कोरोना महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी भारतात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवली जात आहे. काही दिवसांपूर्वी देशभरात लशींची कमतरता होती. मात्र आता सर्वच राज्यांमध्ये लशींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. 15 दिवसात लशींचा साठा सातत्याने वाढला आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये गेल्या एक महिन्यात न वापरलेल्या लशींची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारी आकडेवारीनुसार, ऑक्टोबरच्या सुरुवातीला त्याची संख्या सुमारे 5 कोटी होती, आता मात्र लसीकरण कार्यक्रमांतर्गत 10 कोटींहून अधिक लशींचे डोस राज्यांकडे पडून आहेत. त्यामुळे बहुतांश राज्यांकडे पुरेशी लस आहे. दैनंदिन डोसच्या तुलनेत पुरवठा लक्षणीय वाढला आहे.
देशातील एकूण लशींच्या उत्पादनात वाढ आणि देशातील उत्तम पुरवठा व्यवस्था यामुळे साठ्यात वाढ झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. राज्यांमध्ये आता सुमारे 22.2 कोटी कोविडशील्ड डोस आहेत. त्याचबरोबर, लसीचे सुमारे 60 लाख डोसही राज्यांकडे आहेत. पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ऑक्सफोर्ड-एस्ट्राझेनेका लस ही कोविशील्ड या ब्रँड नावाने तयार करत आहे. तर भारत बायोटेक कोवाक्सिनची निर्मिती करत आहे.
यापूर्वी राज्यांनी अनेकदा लस पुरवठ्याअभावी तक्रार केली होती. तेव्हा कंपन्या त्यांच्या लस उत्पादन वाढवण्याच्या प्रक्रियेत होते. आता दररोज पुरवल्या जाणाऱ्या लशींची संख्या वाढली आहे. आता सरकारला एकाच दिवसात एक कोटीहून अधिक लशीचे डोस मिळाले. रविवारपर्यंतच्या सरकारी आकडेवारीनुसार, राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना किमान 100 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. येत्या आठवड्यात पुरवठा आणखी वाढणार आहे. कारण झायडस कॅडिलाची कोविड-विरोधी लस देखील या यादीत जोडली जाण्याची अपेक्षा आहे.