विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
भारतीयांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कोरोना प्रतिबंधक लसीची मोठी प्रतिक्षा असंख्य नागरिकांना आहे. आणि आता ऑगस्ट महिन्यापासून भारतीय बनावटीची आणखी एक लस येणार आहे. त्यामुळे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन पाठोपाठ आता तिसरी लस सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव मार्ग असल्यामुळे देशात लवकरात लवकर सर्वांचे लसीकरण व्हावे याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचदृष्टीने वेगवेगळ्या कंपन्यांकडून लसींच्या क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत. त्यामधील कोणत्या लस, कधी मिळतील याबाबत आपण जाणून घेऊयात.
कोरोनावर दुसरी स्वदेशी लस ऑगस्टमध्ये मिळणार आहे. हैदराबादमधील बॉयोलॉजिकल-ई कंपनीकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या या लसीचे ३० कोटी डोस खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी कंपनीकडे १५०० कोटी रुपयांची आगाऊ रक्कमही भरण्यात आली आहे. ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान लसीच्या ३० कोटी डोसचा पुरवठा कंपनीकडून केला जाणार आहे. ऑगस्टपासून प्रती महिना सहा कोटी अतिरिक्त डोस उपलब्ध होणार आहेत.
तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल
बॉयोलॉजिकल-ई कंपनीकडून कोविड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. पहिल्या आणि दुसऱ्या क्लिनिकल ट्रायलमधून चांगले निष्कर्ष मिळाले होते. ही लस आरबीडी प्रोटिन सब-युनिटयुक्त आहे. जून-जुलैदरम्यान याचे परीक्षण पूर्ण होणार आहे. तसचे नियामकाची मंजुरीही मिळेल. ऑगस्टमध्ये लसीचा वापर सुरू होणार आहे. मेसर्स बॉयोलॉजिकल-ई लशीचा प्रस्ताव नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-१९ (नेगवॅक) ने चर्चा आणि पडताळणी केल्यावर या लसीला मंजुरी देण्याची शिफारस केली होती.
जुलैपासून या लस
ऑगस्टमध्ये या लसीच्या आगमनापूर्वीच देशात जुलैपासून रशियाच्या स्पुतनिक लसीचे उत्पादन सुरू होणार आहे. स्पुतनिकचे एक ते दीड कोटी डोस बनविण्यास प्रारंभ होईल. रेड्डीज प्रयोगशाळेकडून या लसीची आयातही सुरू राहणार आहे. देशात जुलैपासून फायझर लसीचा डोस मिळण्याचीही शक्यता आहे. कंपनीकडून ५ कोटी डोस खरेदीबाबत चर्चा सुरू असून, जुलैपासून काही लसींचे डोस मिळण्यास सुरुवात होणार आहे.
सीरमचा अर्ज
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने स्पुतनिक लसीच्या उत्पादनासाठी परवाना मागितला आहे. देशातील पाच कंपन्या स्पुतनिक लसीचे उत्पादन करणार आहेत. आता सीरमनेही या लसीच्या उत्पादनात रस दाखविला आहे.
चार लसींचे परीक्षण सुरू
कोविडसंदर्भातील आणखी चार लसींचे परीक्षण सुरू आहे. यामध्ये झायडस कॅडिलाच्या डीएनए लसीचे तिसऱ्या टप्प्यात, जिनोव्हा बॉयोफॉर्मास्युटिकल्सच्या एमआरएन लसीचे तसेच भारत बायोटेकच्या नेझल लसीच्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. त्याशिवाय सीरमने नोवाव्हॅक्सतर्फे विकसित रिकांबिनेंट नॅनोपार्टिकल लसीचे तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत. या लसही लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहेत.