विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशभरातील विविध राज्यात कोरोना लसीकरण मोहीम सुरू असून सर्व नागरिकांना मोफत लस मिळावी, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने या अभियानात वेळोवेळी बदल करण्यात येत आहे. लसीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या कोविन ॲपवर नोंदणी करणे यापूर्वी आवश्यक होते, परंतु आता मात्र थेट लसीकरण केंद्रावर जाऊन नागरिकांना लस घेणे शक्य होणार आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोना विषाणू विरूद्धच्या लसीकरण मोहिमेची गती वाढविण्यासाठी सरकारने ही लस घेण्याचे नियम अधिक सुलभ केले आहेत. कोविन अॅप किंवा वेबसाइटवर ऑनलाईन नोंदणी करणे यापुढे कोरोना लस घेणासाठी बंधनकारक राहणार नाही.
कोणतीही व्यक्ती त्याच्या नजीकच्या लसीकरण केंद्रात जाऊन तेथेच साइटवर नोंदणी करून लस घेऊ शकते. त्यामुळे वय वर्ष १८ ते ४४ आणि वय वर्ष ४५ ते ६० त्याचप्रमाणे ६० वर्षापुढील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत लस मिळणार आहे.
वास्तविक वॉक-इन सेंटर या व्यतिरिक्त लसीकरणासाठी अनेक पध्दतींमध्ये कोव्हीन नोंदणी हा प्लॅटफॉर्म एक आहे. तसेच लसीकरणाला गती देण्यासाठी आरोग्य कर्मचारी आणि आशा वर्कर्स लस घेण्याबाबत ग्रामीण भागातील आणि शहरी झोपडपट्ट्यांमध्ये साइटवर नोंदणीसंबंधी जागरूकता निर्माण करतील.
यावर्षी १६ जानेवारी रोजी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरू झाली होती. आतापर्यंत देशात कोविड -१९ लसांच्या २६ कोटीहून अधिक डोस दिल्या गेल्या आहेत. मंगळवारी १८ते ४४ वयोगटातील १३,१३, ४३८ लोकांना लसचा पहिला डोस देण्यात आला, तर ५४, ३७५ लोकांना दुसरा डोस देण्यात आला.
देशभरातील १८ ते ४४ वर्षे वयोगटातील ४, ४९, ८७,००४ लोकांना कोविड -१९ लसचा पहिला डोस मिळाला आहे व तिसऱ्या टप्प्याच्या सुरूवातीपासूनच ८, ९५,५१७ लोकांना दुसरा डोस मिळाला आहे. देशातील कोविड लसीकरण मोहीमेत बिहार, दिल्ली, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये १८ ते ४४ वर्षे वयोगटातील प्रत्येक राज्यात १०ते १२ लाखाहून अधिक लोकांना डोस दिले गेले आहेत.