विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
ज्या भागात इंटरनेट किंवा मोबाईलचे नेटवर्क नाही तेथील नागरिकांना लसीकरणाची नोंदणी करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. याची दखल घेत आता ही नोंदणी फोन कॉलद्वारेही करता येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या वतीने देशभरात १०७५ या हेल्पलाईन क्रमांकाचे कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. कोरोना लसीची नोंदणी करण्यासाठी आपण आता फोन कॉल करु शकता. कारण ग्रामीण भागात अद्ययावत तंत्रज्ञान आणि इंटरनेट नसल्याने लोक सेवा केंद्रांतून नोंदणी व स्लॉटही बुक करू शकतात.
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे (एनएचए) प्रमुख आर. एस. शर्मा यांनी सांगितले की, खेड्यांमध्ये लसीकरण मोहिमेत लोकांना सहभागी करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी जनजागृती करत आहेत, आणि ग्रामीण भागातील लोकांना लसीकरण करण्यास मदत करत आहेत.
शर्मा पुढे म्हणाले की, सर्वसाधारणपणे, खेड्यातील लोकांना लसीपासून दूर ठेवले जात आहे असे म्हणणे योग्य ठरत नाही. ४५ जास्त वयाचे निम्म्याहून अधिक लोक थेट केंद्राकडे जाऊन नोंदणी करुन लस घेतात. मात्र आता ही समस्या १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांची आहे, कारण लसीचा पुरवठा कमी आहे. तर फोन कॉल ही प्रणाली पूर्णपणे पारदर्शक आहे. व्हीआयपी असो किंवा सामान्य नागरिक असो लसीकरणासाठी सर्वांना समान डोस द्यावा लागतो. यामुळे लोकांना आत्मविश्वास मिळतो की, ही प्रणाली कोणालाही प्रथम प्राधान्य देत नाही, तर समानता बाळगते, असे शर्मा यांनी स्पष्ट केले.
या नंरबला करा कॉल
लसीच्या नोंदणीसाठी नागरिकांना १०७५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा लागेल. आपले संपूर्ण नाव, पत्ता, आधार कार्ड क्रमांक आदी माहिती द्यावी लागेल. त्यानंतर ही नोंदणी होईल. तसेच स्लॉट बुकींगसाठीही नागरिकांना १०७५ या हेल्पलाईन क्रमांकावरच संपर्क साधावा लागेल.