विशेष प्रतिनिधी, मुंबई
केंद्र सरकारने १८ वर्षांवरील तरुणांसाठी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचा मार्ग तर मोकळा करून दिला. पण अद्याप हा मार्ग पाहिजे तेवढा सहज आणि सोपा ठरू शकलेला नाही. कारण लस घेण्यासाठी स्लॉट ओपन केला की दुसऱ्या क्षणाला पूर्णपणे बुक असल्याचे दाखविले जाते. त्यामुळे एकीकडे आश्चर्य आहे आणि दुसरीकडे संतापही.
अर्थात यामागे गुगलचे ते एक्स्टेंशन आहे, जे कोडिंगच्या तज्ज्ञांनी ओपन प्लॅटफॉर्मवर टाकले आहे. हे एक्स्टेंशन अवघ्या काही क्षणात पहिलेपासून सेव्ह करून ठेवलेली माहिती कोविन वेबसाईटवर भरून स्लॉट बुक करून टाकते. मात्र सर्वसामान्य माणूस त्याचवेळी नाव, वय, पत्ता आदी माहिती भरत राहते.
गेल्या काही दिवसांपासून तंत्रज्ञानातील तज्ज्ञांनी कोडिंग करून हे काम सुरू ठेवले आहे. मात्र आता अनेक अॅप डेव्हलपर्सने त्यावरही आपापल्या पद्धतीने निर्बंध घातले आहे. तर काहींनी बॉट प्रोग्रामच्या माध्यमातून एक्स्टेंशन बनवून त्याला सर्वांसाठी खुले केले आहे.
कोविन बुकिंग, कोविन इन्स्टंट यासारख्या नावांनी एक्स्टेंशनचा वापर करणे सोपे झाले आहे. मात्र ज्या लोकांसाठी स्मार्ट फोन वापरणेच मोठे अवघड आहे, त्यांच्यासाठी गुगल एक्स्टेंशन डोकेदुखी होऊन बसले आहे.
असे काम करते एक्स्टेंशन
एक्स्टेंशन डाऊनलोड करून कोविन वेबसाईटवर नाव, पत्ता, मोबाईल नंबर, पिन कोड, लसीकरण केंद्र, आदी माहिती पहिल्यापासून भरून सेव्ह करता येते. त्यानंतर ज्यावेळी स्लॉट बुकिंगसाठी वेबसाईट उघडली जाते, एक्स्टेंशन आपला कमाल दाखविणे सुरू करते. त्यात पहिलेपासून आपल्याकडे असलेली माहिती एक्स्टेंशन नोंदवायला सुरुवात करतो. क्लिक केल्याबरोबर लगेच ओटीपी येतो आणि तुम्ही लॉगइन करू शकता. त्यानंतर ज्या लसीकरण केंद्रावर स्लॉट रिकामा आहे ते एक्स्टेंशन तातडीने शोधून काढत बुकींग कन्फर्म करते. या प्रक्रियेत टाईम स्लॉट निवडणे, कॅप्चा कोड टाकणे आदी कामे देखील एक्स्टेंशनच करून टाकते.