मुंबई – कोरोना विषाणूचा अधिक धोकादायक व्हेरिएंट आढळण्याची शक्यता आता कमी झाली आहे. वेळ जाईल तसा विषाणू कमी घातक होत जाईल आणि कोविडचा परिणाम कमी होऊन साधी सर्दी आणि खोकल्यासारखाच राहील, असा दावा ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका ही कोरोनाविरोधी लस बनविणार्या प्रा. डेम साराह गिलबर्ट यांनी केला आहे. रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिनच्या एका परिसंवादात त्या बोलत होत्या.
प्रा. गिलबर्ट म्हणाल्या, लोकांमधील रोगप्रतिकारक शक्ती दररोज वाढत असल्याने कोरोना विषाणू जितका पसरेल तितकाच कमकुवत होत जाईल. आपण आधीपासूनच माणसांमध्ये आढळणार्या चार प्रकारच्या कोरोना विषाणूंसोबत राहात आहोत. परंतु त्याबाबत आपण कधी जास्त विचार करत नाही. असा एक दिवस येईल जेव्हा आपण अशाच प्रकारे सार्स-सीओव्ही-२ (कोविड)ची जास्त काळजी करणार नाही.
प्रा. गिलबर्ट पुढे म्हणाल्या, की कोरोना विषाणू आता संक्रामक असला तरी त्याच्या प्रसारासाठी नवे ठिकाणे राहिलेली नाहीत. कोरोना विषाणूचे घातक व्हेरिएंट आढळण्याची आता शक्यता नाही. कोरोनाच्या बिटा व्हेरिएंटविरुद्ध लशीत बदल करण्याचा जास्त परिणाम होणार नाही. लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना परिवर्तीत लशीचा तिसरा डोस दिला तरी रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास विशेष परिणाम जाणवणार नाही.
भारतात तिसऱ्या लाटेची शक्यता मावळली
प्रा. गिलबर्ट यांनी दावा केला की, भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता नाही या भारतीय तज्ज्ञांच्या दाव्याला आता बळ मिळत आहे. तत्पूर्वी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिसिस कंट्रोलचे संचालक सुजीत सिंह म्हणाले होते की, कोरोनाचा कोणाताही नवा व्हेरिएंट आढळला तरी तो तिसरी लाट आणू शकत नाही. आगामी सहा महिन्यात कोरोना पँडॅमिकवरून अँडॅमिकमध्ये रूपांतरित होईल. एक असा आजार ज्याच्यासोबत माणूस जीवन जगणे शिकतो, त्यालाच अँडामिक असे म्हणतात. जनावरांमध्ये न आढळणारे चेचक आणि पोलियोसारखे विषाणू नष्ट होऊ शकत नाही. परंतु कोरोना विषाणू जनावरांमध्येही आढळतो. त्यामुळे जनावरांमधून विषाणूचे माणसांमध्ये संक्रमण होतच राहील. परंतु त्याचा घातक परिणाम होणार नाही.