राजगढ (मध्य प्रदेश) – भारतात लस टाळण्यासाठी लोक नानाविध कारणं देत आहेत. त्यात काही तर अफलातून आहेत. काही दिवसांपूर्वी एका सरकारी कर्मचाऱ्याने लस घेण्यासाठी अंतर्मन परवानगी देत नसल्याचे सांगितले होते. तर आता दोन दिवसांपूर्वी मध्यप्रदेशात एक जण लस टाळण्यासाठी थेट झाडावरच जाऊन बसला. या घटनेचे व्हिडीयो आणि फोटो व्हायरल झाले आणि आता सोशल मिडीयावर त्याची जोरदार चर्चा होत आहे.
कोरोनाचा सामना करण्याच्या लढाईत सरकारने जास्तीत जास्त लोकांना लस देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र आतासुद्धा लसीच्या संदर्भात पाहिजे तशी जनजागृती झालेली नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात भिती आहे. मध्य प्रदेशमधील राजगड जिल्ह्यात लस न घेण्यासाठी एक तरुण थेट झाडावरच जाऊन बसला. राजगडमधील पाटन कला गावात आरोग्य विभागाची एक चमू कोरोना लसीकरण शिबिरासाठी आलेली होती.
शिबिरात लस लावून घेण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली होती. मात्र कंवरलाल नावाचा हा गावकरी लस घेण्यासाठी तयार नव्हता. परिसरातील लोकांनी वारंवार त्याला समजावले. आरोग्य अधिकाऱ्यांनीही त्याला लसीचे महत्त्व समजावून सांगितले. पण तो ऐकायलाच तयार नव्हता. पण गावकऱ्यांनी त्याच्या पत्नीला मात्र लस घेण्यासाठी तयार केले आणि तिला शिबिरात घेऊन आले. कंवरलालला जेव्हा याबाबत कळले तेव्हा बायकोचे आधार कार्ड घेऊन तो पळून गेला आणि थेट झाडावरच जाऊन बसला.
गोंधळात गोंधळ
कंवरलालला लस घ्यायचीच नाही म्हटल्यावर लोकांनी त्याला सोडून दिले. पण त्याच्या पत्नीला कसेबसे तयार केले. त्यात कंवरलाल स्वतःही झाडावर जाऊन बसला आणि पत्नीचेही आधार कार्ड घेऊन गेला. गावकरी त्याला खाली उतरण्याची विनंती करीत होते. पण तो शिबीर संपल्यावरच खाली उतरला.
अखेर भ्रम दूर झाला, पण…
स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी कंवरलालची समजूत घातली. त्याला लसीचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर त्याच्या मनातील भ्रम दूर झाला, पण तोपर्यंत लसीकरण शिबीर संपलेले होते. त्यामुळे आता कंवरलाल आणि त्याच्या पत्नीला लस घेण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.