नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना लसीकरणाच्या राष्ट्रीय मोहिमेंतर्गत आतापर्यंत लशीचे कोट्यवधी डोस देण्यात आले आहेत. लसीकरण सुरू झाल्यानंतर लशीचे डोस दिल्यामुळे काही जणांचे मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते. याविषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय समितीने (एइएफआय) लसीकरण झाल्यानंतरच्या प्रतिकूल घटनांबद्दल मत नोंदवले आहे. फेब्रुवारी २०२१ पासून ते आतापर्यंत लाखो लशीचे डोस दिल्यानंतर ९ नागरिकांचे मृत्यू झाले आहेत, असे एइएफआयने म्हटले आहे.
कोरोना लशीमुळे झालेल्या नऊ मृत्यूंपैकी प्रत्येकी दोन मृत्यू लशीच्या रिएक्शनमुळे झाले आहेत. तेलंगण, महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या मृत्यूंचे ए१ म्हणून वर्गीकरण करण्यात आले होते. तर केरळ, हरियाणा आणि चंडीगढमध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाला होता. पीडितांपैकी ८ जणांना कोविशील्ड आणि एकाला कोवॅक्सिन लस देण्यात आली होती.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एनाफिलेक्सिस, थ्रोम्बिसिस आणि थ्रोम्बिसाइटोपेनिया सिंड्रोमसारख्या लशीच्या साइड इफेक्टमुळे नऊ जणांचे मृत्यू झाले आहेत. एनाफिलेक्सिसच्या अंदाजे होणाऱ्या घटनांचे प्रमाण फ्लूवर दिल्या जाणाऱ्या लशीच्या प्रतिमिलियन डोसच्या १.३ आहे, असे तज्ज्ञ सांगतात.
एकूणच लसीकरणाच्या तोट्यांच्या लहान जोखमींच्या तुलनेत लशीचे फायदे अधिक आहेत. खबरदारी म्हणून तोट्यांचे सर्व संकेत ट्रॅक केले जात असून, वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. एइएफआयकडून तयार करण्यात आलेला फेब्रुवारी २०२१ ते मार्च २०२२ दरम्यानचा डेटा ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने एकत्रित केला आहे. त्याच्या आधारावर ही माहिती समोर आली आहे. देशात पहिला, दुसरा आणि बूस्टर डोससह १८६ कोटी डोस देण्यात आलेले आहेत.
लसीकरण विभागाने आतापर्यंत १,११२ प्रतिकूल घटना आणि ३९१ मृत्यूंच्या संदर्भात १३ अहवाल जारी केले आहेत. यापैकी बहुतांश प्रकरणे योगायोग असल्याचे वर्गीकृत करण्यात आले आहेत. ९ जणांच्या ए१ मृत्यूंशिवाय किमान ४५ जणांचे ‘अचानक अस्पष्ट मृत्यू’ म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहेत. क्लिनिकल माहिती, शवविच्छेदन अहवाल किंवा इतर कोणतेही कागदपत्रे न मिळाल्यामुळे असे वर्गीकरण करण्यात आले आहे.