इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजपासून ‘कोविड लस अमृत महोत्सव’ साजरा केला जाणार असून याअंतर्गत पुढचे ७५ दिवस बूस्टर डोस मोफत दिला जाणार आहे. सर्व महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर ३० सप्टेंबरपर्यंत मोफत डोस मिळणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली असून यानिमित्ताने देशात ७५ दिवसांसाठी ‘कोविड लस अमृत महोत्सव’ राबवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी बूस्टर डोस घ्यावा हा या उपक्रमामागील उद्देश असून, १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना बूस्टर डोस घेता येणार आहे.
ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले असतील आणि ते घेऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला असेल तर केंद्र सरकारच्या निकषांनुसार बूस्टर डोस घेता येतो. कोणत्याही महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लसीचा हा बूस्टर डोस घेता येतो. अनेकांना अद्यापही कोरोना लसीच्या बूस्टर डोसबाबत संभ्रम वाटतो आहे.
लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. पण कोरोनापासून बचाव करण्यासाठी बूस्टर डोस घेणं अत्यंत महत्त्वाचे असून त्याची जाणीव करुन देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही बूस्टर डोस घेणे का महत्त्वाचे आहे, डोस घेतल्यानंतर काही त्रास तर होणार नाही ना, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या बातमीतून आपण पाहणार आहोत.
लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर अतिरिक्त दिल्या जाणाऱ्या डोसला बूस्टर डोस म्हणतात. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बूस्टर डोस दिला जातो. जगभरात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येतो. अनेक व्हेरियंट्स कोरोनाचे दिसून येतात. या प्रत्येक व्हेरियंटचा प्रभाव आणि लक्षणे वेगवेगळी असल्याने बूस्टर डोस घेणे फायदेशीर आहे. तसेच कोरोना प्रतिबंध लसीचे दोन डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी त्यांचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागतो. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कोरोना लसीचा तिसरा डोस म्हणजेच, बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढून कोरोनापासून बचाव होण्यास मदत होते.
१८ वर्षांवरील आणि ज्यांनी कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत अशी कोणतीही व्यक्ती बूस्टर डोस घेऊ शकते. याआधी बूस्टर डोस फक्त वयोवृद्धांसाठी आवश्यक असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र यावर्षी एप्रिलमध्ये सरकारने मोठा निर्णय घेत बूस्टर डोस १८ वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस घेता येणार असल्याचे जाहीर केले आहे.
कोरोनाचा दुसरा डोस आणि बुस्टर डोस यांच्यातील अंतर ९ महिन्यांवरुन ६ महिन्यांवर आरोग्य मंत्रालयाने आणलं आहे. जास्तीत जास्त लोकांनी बुस्टर डोस घ्यावा, या हेतूने हे अंतर कमी करण्यात आले आहे. यासोबतच केंद्र सरकारने प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करण्यासाठी १ जूनपासून ‘हर घर दस्तक’ मोहीम २.० सुरु केली आहे. जवळच्या खाजगी लसीकरण केंद्रावर बूस्टर डोससाठी नोंदणी करु शकतात.
कोरोनाचा बूस्टर डोस फक्त सरकारी हॉस्पिटलमध्येच मोफत मिळेल. खासगी रुग्णालयात कोणी बूस्टर डोस घेतल्यास त्यासाठी त्यांसाठी पैसे मोजावे लागतील. खाजगी केंद्रांवर कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या बूस्टर डोससाठी २२५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
Covid Vaccination Booster Dose Detail Information