अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
जर तुम्हाला लसीकरण करुन तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला असेल, तर संसर्गाबद्दल निष्काळजी वृत्ती धोकादायक ठरू शकते. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे. लस घेतल्यानंतर तीन महिन्यांनी प्रतिकारशक्ती पुन्हा कमी होऊ शकते. त्यामुळे बूस्टर डोस घेण्याचीही आवश्यकता असल्याचे या मार्गदर्शन तत्वांमध्ये म्हणलं आहे.
जगभरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आता कमी झाले आहे. दिवसागणिक संक्रमित रुग्णांची संख्याही घटते आहे. पण तरीदेखील सर्व आवश्यक काळजी घेण्याची गरज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. त्यानुसार संघटनेने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही बदलदेखील केले आहेत. नवीन तत्वांनुसार असे दिसून येत आहे की लस मिळाल्यानंतर तीन महिन्यांनंतर शरीराची प्रतिकारशक्ती कमी होईल. त्यामुळे, जगभरात लसीकरण झालेल्यांसाठी बूस्टर डोसची मागणी वाढू शकते. सद्यस्थितीत बूस्टरच्या डोस मिळालेल्यांची संख्या अत्यल्प असल्याचेही त्यांनी म्हणले आहे.
ज्या लोकांना नुकतीच अँटी-कोरोना लस मिळाली आहे त्यांना संसर्गाची शक्यता अतिशय कमी आहे. परंतु ज्या लोकांना ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस लस घेऊन झाले आहे, त्यांना संसर्गाची शक्यता जास्त आहे. कारण त्यांच्या शरीराची संसर्गाचा सामना करण्यासाठीची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. आरोग्य संघटनेने असेही म्हटले आहे की जर लसीकरण झालेले लोकं संक्रमित लोकांच्या संपर्कात आले तर त्यांनाही संसर्गाचे नियम पाळावे लागतील. तसेच जर तुमच्या शरीरात कोणतेही लक्षण नसेल तर चाचणी करु नका, असा सल्लाही देण्यात आला आहे. तसेच ओमिक्रॉन प्रकारामुळे पसरलेल्या कोरोना संसर्गाची प्रकरणे आता जगभरात कमी झाली असल्याचेही आरोग्य संघटनेने सांगितले आहे.
दरम्यान, कोरोना रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला आता फक्त सात दिवस क्वारंटाईन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यापूर्वी हा कालावधी १४ दिवसांचा होता. क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर, संसर्ग पसरण्याचा धोका फक्त एक टक्का इतकाच असल्याचे आढळून आले आहे. हा डेटा मात्र ओमिक्रॉन पसरण्याआधीच्या अशा प्रसारावर आधारित आहे.