नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी आपण ज्या कंपनीच्या लसीचे दोन डोस घेतले असतील त्याच कंपनीचा बूस्टर डोस आपल्याला घ्यावा लागणार आहे. सरकारी व्यवस्थेने यावर शिक्कामोर्तब केला असून, वेगवेगळ्या लशींचे मिश्रण करण्यास सरकारची मंजुरी नसल्याने ही बाब अधोरेखित झाली आहे.
कोरोना संसर्गाचे आव्हान अद्यापही पूर्णतः संपलेले नाही. चीन तसेच काही युरोपियन देशांमध्ये कोरोनामुळे अद्याप थैमान माजलेले आहे. त्यामुळे भारतात बूस्टर डोस नागरिकांना घ्यावा याविषयी सरकार आग्रही आहे. हा बूस्टर डोस लशीच्या इतर कंपन्यांचाही चालेल की जो डोस आपण घेतला आहे त्याच कंपनीचा बूस्टर डोस असावा याबाबत जनतेमध्ये संभ्रम दिसून येतो. त्यामुळे गुरुवारी सीएमसी वेल्लोरच्या अध्ययनाच्या आधारे दोन डोस ज्या कंपनीचे घेतले असतील त्याचाच बूस्टर डोस घ्यावा यावर चर्चा करण्यात आली.
तर दुसरीकडे, ज्यांनी कोव्हॅक्सिनचे डोस घेतले असतील आणि कोव्हिशिल्डचा बूस्टर डोस घेतला असेल तर त्यांच्यात सहा ते दहा पट अँटिबॉडीज वाढल्याचे दिसून आले. ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोरच्या अध्ययनाची समीक्षा करणाऱ्या एनटीएजीआयच्या कोरोना कार्य समूहाने असे म्हणले आहे. पण जेव्हा कोव्हिशिल्डचे दोन डोस घेतलेल्यांना कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस देण्यात आला तेव्हा मात्र हा रिझल्ट दिसून आला नाही. त्यामुळे ज्या लशीचे दोन डोस घेतले असतील त्याचाच बूस्टर डोस घ्यावा असा निर्णय घेण्यात आला. मात्र, अजूनही या विषयावर चर्चा केली जाणार असून, लशींच्या फरकांमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा विचार केला जाणार आहे. सद्यस्थितीत भारतात कोरोना लशींचे मिश्रण करण्याची परवानगी नाही. पण मेरोजी बायोलॉजिकल ईने भारताच्या औषध नियंत्रक विभागाकडे एक अर्ज केला आहे. ज्यात कोरबेव्हॅक्स या लशीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.