नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिकेतून जगभरात पसरलेल्या ओमिक्रॉनचा संसर्ग सध्या ९१ देशांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे. युरोपमध्ये तर तो प्रचंड वेगाने पसरत आहे. भारतातही नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेतली नाही तर तिसरी भयावह लाट येऊ शकते असा गंभीर इशारा देण्यात आला आहे. भारतात दररोज १४ लाख रुग्णांची नोंद होण्याची शक्यता नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनी वर्तविली आहे.
पॉल यांनी सांगितले की, जगातील अनेक देश साथीच्या रोगाचा एक नवीन टप्पा पार करत आहेत. डेल्टाचा कहर युरोपातील ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी इत्यादी अनेक देशांमध्ये आधीच सुरू होता. आता ओमिक्रॉनच्या भर पडली आहे. नागरिकांनी आधीच मिळवलेली प्रतिकारशक्ती निष्प्रभ करत आहे. ब्रिटनमध्ये दररोज सुमारे ९० हजार कोरोना बाधितांची नोंद होत आहे. भारतीय लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून ब्रिटनच्या लोकसंख्येकडे पाहिले तर ते दररोज १४ लाख नवीन संक्रमणाच्या बरोबरीचे आहे. भारतात दुसऱ्या लाटेत रोज ४ लाख बाधित होत होते. म्हणजेच तिसरी लाट आली तर ती दुसऱ्या लाटेपेक्षा तिपटीहून अधिक संसर्गजन्य असेल, असा इशारा पॉल यांनी दिला आहे.
फ्रान्समध्ये ८० टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे, परंतु तेथे बाधित वाढत आहेत. म्हणजे भारतीय लोकसंख्येच्या प्रमाणात दररोज १३ लाख रुग्णांची तेथे नोंद होत आहे. नॉर्वेमध्ये तशीच स्थिती आहे. तेथे १८ टक्के नवीन संक्रमण हे ओमिक्रॉनमुळे झाले आहे. पॉल पुढे म्हणाले की, युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात संक्रमण वाढत असून हा महामारीच्या नवीन टप्प्याचा संकेत आहे. आतापर्यंत भारतात संसर्ग सौम्य आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर संकट आलेले नाही. परंतु तरीही ही परिस्थिती चिंताजनकच म्हणावी लागेल, असे पॉल यांनी सांगितले.
ब्रिटनमध्ये सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. ब्रिटीश सरकारच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी सुमारे ९३ हजार नवीन बाधितांची नोंद झाली आहे. त्याचवेळी, एका दिवसात मृतांचा आकडा १११ वर पोहोचला आहे. सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार, ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ११ दशलक्षाहून अधिक झाली आहे. त्याचवेळी, या महामारीमुळे १ लाख ४७ हजार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.