विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशात कोरोना रुग्णसंख्येत चांगलीच घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी राज्यांकडून अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परंतु अनलॉकदरम्यान लोकांनी गाफिल न राहता कोरोनाचे नियम पाळावेच शिवाय लसीकरणही करून घ्यावे. कारण कोरोनाची तिसरी लाट कधीही दार ठोठावू शकते, असा इशारा नीती आयोगाने दिला आहे. तर, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये किसरी लाट येण्याचे संकेत काही तज्ज्ञांनी दिले आहेत.
भारताने कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना चांगल्या प्रकारे केल्याने संसर्ग नियंत्रणात आला असून रुग्णसंख्येत लक्षणीयरित्या घट झाली आहे, असे मत नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी व्यक्त केले आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण करणे आवश्यक आहे. येत्या सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याचे खूपच स्पष्ट संकेत कोविड तज्ज्ञांनी दिले आहेत. त्यामुळे देशातील जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे, असेही सारस्वत यांनी स्पष्ट केले आहे.
योग्य व्यवस्थापन
कोविडची दुसरी लाट थोपविण्यासाठी भारतात चांगल्या प्रकारे काम झाले आहे. केंद्राने चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळली आहे. परिणामस्वरूप रुग्णसंख्या खूपच कमी झाली आहे, असे सारस्वत म्हणाले. संशोधक आणि तंत्रज्ञानाचे सहाय्य, ऑक्सिजन बँक बनविणे, ऑक्सिजन पुरवठ्यासाठी मोठ्या प्रमाणात उद्योग स्थापन करून कोरोनाशी दोन हात करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, असेही सारस्वत यांनी सांगितले.
आत्मविश्वास
देशात दररोज चार लाखांवर रुग्ण आढळत होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या घटून १.३ लाखांवर आली आहे. कोविड-१९ च्या पहिल्या लाटेदरम्यान भारतात कोविडचे चांगले व्यवस्थापन केले होते. त्यामुळेच दुसरी लाट नियंत्रित ठेवण्याचा आत्मविश्वासही मिळाला.
बरे होण्याचा दर
कोविडची दुसरी लाट नियंत्रणात ठेवण्यासाठी आपतकालीन व्यवस्थापनाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी (४ जून) सकाळी आठ वाजता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात एका दिवसात १,३२,३६४ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढून २,८५,३५० झाली आहे. तर रुग्णांचा बरे होण्याचा दर ९३ टक्क्यांवर गेलेला आहे.