इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशात सलग नऊ दिवस कोरोना संसर्गाच्या प्रकरणांची संख्या घटली आहे. २१ जानेवारी रोजी देशात विक्रमी म्हणजे ३.४७ लाख नवीन संसर्ग प्रकरणांची नोंद झाली होती. त्यानंतर मात्र संसर्ग होण्याचे प्रमाण घटले आहे. त्यामुळेच तिसर्या लाटेची लहर आता सरली असून ती हळूहळू संपणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रविवारी २.३४ लाख नवीन कोरोना संसर्गाची नोंद झाली आहे आणि गेल्या नऊ दिवसांपासून त्यात घट होत आहे. असे असले तरी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे की, विषाणूचा एकूण संसर्ग कालावधी चौदा दिवसांचा आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसांची आकडेवारी पाहिली जाईल. त्यानंतर लाट ओसरत असल्याच्या विषयावर शिक्कामोर्तब केले जाईल.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, २१ जानेवारीला सर्वाधिक संसर्गाची नोंद झाली आहे. त्या तारखेपासून आम्हाला पुढील चौदा दिवसांचा डेटा पाहायचा आहे. कारण विषाणूच्या संसर्गाचा कालावधी चौदा दिवसांचा असतो. आता येत्या पाच दिवसांच्या संसर्गाची आकडेवारी ठरवेल की तिसरी लाट ओसरत चालली आहे की अजून येणे बाकी आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आकडेवारीच्या ट्रेंडवरून कोरोनाची लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांत संसर्गाचे प्रमाण आणखी कमी होईल. दरम्यान, आणखी एक चांगली परिस्थिती सातत्याने निर्माण झाली आहे की, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सक्रिय रुग्ण झपाट्याने कमी होत आहेत. २२.५ लाखांवर पोहोचलेले सक्रिय रुग्ण आता रविवारी १८ लाख ८४ हजार ९३७वर आले आहेत. संसर्गाचे प्रमाणही कमी होत आहे.
दिल्लीत ३ हजार ६७४ नवीन रुग्ण आढळले आहेत. संसर्ग दर ६.३ वर घसरला. शनिवारी ६ हजार ९५४ रुग्ण बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले ही दिलासादायक बाब आहे. गेल्या एका आठवड्यात देशभरातील कोरोना संसर्गाची लागण होण्याच्या दरात घट झाली आहे. देशातील ७५ टक्के प्रौढ लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत ही दिलासादायक बाब आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली आहे. देशातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.