नवी दिल्ली – भारत, ब्राझील, तुर्की, इराणसह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हाहाकार उडाला आहे. गेल्या २४ तासात कोरोनामुळे जगात १४ हजार रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. याकाळात ८ लाख ६५ हजार नवे बाधित आढळले आहेत.
जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील डाटानुसार, शनिवारी कोरोना रुग्णांचा जगातील आकडा १४ कोटी ५२ लाख ७१ हजार २०८ वर पोहोचला आहे. एका दिवसापूर्वी हाच आकडा १४ कोटी ४३ लाख ८५ हजार २१७ होता. मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ३० लाख ८३ हजार २३५ वर पोहोचली आहे. शुक्रवारी हा आकडा ३० लाख ६९ हजार २९३ इतका होता.
कोरोना महामारीत अमेरिका सर्वाधिक प्रभावित झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत तीन कोटी २७ लाख लोकांना संसर्ग झाला आहे. तर पाच लाख ८५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे. अमेरिकेनंतर भारत आणि ब्राझीलचा क्रमांक लागतो.
ब्राझीलच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात २,९१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात कोरोनामुळे मृतांचा आकडा तीन लाख ८६ हजार ४१६ वर पोहोचला आहे. यादरम्यान ६९ हजार १०५ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत.
आतापर्यंत एक कोटी ४२ लाख ३७ हजारांहून अधिक बाधित आढळले आहेत. तुर्कीमध्ये शुक्रवारी ४९ हजार ४३८ नवे रुग्ण आढळले असून, ३४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये २२ हजार ९०४ नवे रुग्ण आढळले आहेत. ३८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
इतर देशातील स्थिती
दक्षिण कोरिया – २४ तासात ७८५ नवे रुग्ण आढळल्याने रुग्णांचा आकडा १ लाख १८ हजारांहून अधिक झाली आहे. येथे एकूण १,८१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रशिया – रशियामध्ये ८,८२८ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामध्ये २,५४१ रुग्ण मॉस्कोमध्ये आढळले आहेत. एकूण ४७ लाख ५३ हजार रुग्णसंख्या झाली आहे.