लंडन – जगभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रोलिया आणि फ्रान्ससह इतर देशांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ब्रिटनमध्ये गेल्या २४ तासात कोरोनाचे विक्रमी १,२९,४७१ नवे रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत साप्ताहित संसर्गाच्या दरात ५७.७ टक्के वृद्धी झाली आहे. ब्रिटनमध्ये गेल्या एका आठवड्यादरम्यान ७,६३,२९५ नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिनामध्ये सुद्धा एक दिवसात दुप्पट नवे रुग्ण आढळत आहेत.
अमेरिकेत दररोज २ लाख रुग्ण
अमेरिकेत कोरोनाचा कहर कायम आहे. येथे दररोज आढळणार्या कोरोनारुग्णांमध्ये ७६ टक्के रुग्ण ओमिक्रॉनबाधित आहेत. सोमवारी एका दिवसात २,१३,०५० नवे रुग्ण आढळले आहेत. अधिकार्यांच्या माहितीनुसार, २० डिसेंबरला एका आठवड्यात दररोज सरासरी १,४९,५२५ नवे रुग्ण आढळले होते. २७ डिसेंबर रोजी एका आठवड्यात प्रतिदिन सरासरी २,३५,८५६ नवे रुग्ण आढळत आहेत. म्हणजेच साप्ताहिक संसर्गाच्या दरात ५७.७ टक्क्यांची वाढ झाली आहे.
अमेरिकेतील सीडीसी या आरोग्य संस्थेच्या माहितीनुसार, अमेरिकेत मुलांना संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण चार पटीने वाढले आहे. ही बाब चिंताजनक आहे. सीडीसीने विलगीकरणाचा काळ दहा दिवसांवरून पाच दिवस कमी करण्याची शिफारस केली आहे. ज्यांच्यात लक्षणे दिसत नसेल त्यांना किमान पाच दिवस विलगीकरणात राहणे बंधनकारक असेल. त्याच्या पुढील पाच दिवसात रुग्णांच्या आसपास येणार्या प्रत्येकाला मास्क घालणे आवश्यक आहे.
ब्रिटनमध्ये विक्रमी रुग्णसंख्या
ब्रिटनमध्ये दररोज कोरोनारुग्णांची विक्रमी वाढ होत आहे. गेल्या २४ तासात कोरोनाचे विक्रमी १,२९,४७१ नवे रुग्ण आढळले आहेत. एका आठवड्यात आढळलेल्या रुग्णांवर नजर टाकल्यास जवळपास ७,६३,२९५ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. म्हणजेच दररोज एक लाख रुग्ण आढळत आहेत. आकडेवारीनुसार २५ डिसेंबरला १,१३,६२८ नवे रुग्ण, २६ डिसेंबरला १.०७,४६८ आणि २७ डिसेंबरला ९८,५१५ नवे रुग्ण नोंदविले गेले आहेत.
दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी एक आश्चर्यचकित करणारा निर्णय घेतला आहे. जॉन्सन यांनी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जल्लोष करण्यावर कोणतेही निर्बंध न लावण्याचा निर्णय घेतला आहे. अर्जेंटिनामध्ये सुद्धा कोरोना रुग्णांची वाढ दिसून आली आहे. गेल्या सहा महिन्यात सोमवारी प्रथमच एका दिवसात वीस हजार नवे रुग्ण आढळले आहेत. २६ डिसेंबरला ७,६२३ रुग्ण आढळले होते. २७ डिसेंबरला २०२६३ नवे रुग्ण आढळले आहेत. ऑस्ट्रेलियातील तीन राज्यांमध्ये एका दिवसात दहा हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.
फ्रान्समध्ये नव्या नियमांची घोषणा
फान्स सरकारने कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपाशी सामना करण्यासाठी सोमवारी काही नवे नियम लागू करण्याची घोषणा केली आहे. नव वर्षापूर्वी कोणतेही कठोर निर्बंध लावण्यात आले नाहीत. फ्रान्सचे पंतप्रधान ज्यां कास्टेक्स म्हणाले, की पुढील आठवड्यापासून बंद केंद्रांमध्ये आयोजित होणार्या कार्यक्रमात दोन हजार आणि खुल्या ठिकाणी आयोजित होणार्या कार्यक्रमांमध्ये पाच हजार नागरिक सहभागी होऊ शकतील.
संगीत कार्यक्रमादरम्यान नागरिकांना आपल्या जागेवरच बसून राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बारमध्ये ग्राहकांना उभे राहण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. चित्रपटगृहे, क्रीडा केंद्रे आणि सार्वजनिक परिवहनामध्ये खाण्या-पिण्याच्या सुविधांवर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. शक्य झाल्यास आठवड्यातून तीन दिवस घरातूनच काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे नियम कमीत कमी तीन आठवडे कायम राहतील. फ्रान्समध्ये एका दिवसात एक लाखाहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.