नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची प्रकरणे कमी होत असताना, आता तिसऱ्या लाटेचा अंदाज येऊ लागला आहे. परंतु कोरोना व्हायरस महामारीची दुसरी लाट अद्याप संपलेली नसून तिसरी लाट लोकांच्या योग्य वर्तनावर अवलंबून आहे, असे मत दिल्लीस्थित एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या स्मरणार्थ सीआयएसएफने ‘आजादी का अमृत महोत्सव’ उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात डॉ. गुलेरिया बोलत होते. यावेळी गुलेरिया म्हणाले की, भारतात कोरोना महामारीची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही याची जाणीव लोकांना झाली पाहिजे. कोरोनाच्या दैनंदिन प्रकरणांची संख्या ४० हजारांपेक्षा जास्त होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने कोरोनाच्या नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे. नियमांचे पालन केले तर देशात कोरोनाची आणखी एक लाट येण्यापूर्वीच थांबवता येणे शक्य होईल, अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर बनू शकते असेही ते म्हणाले.
कोरोना विषाणू पहिल्यांदा २०१९ मध्ये चीनच्या वुहान शहरात सापडला आणि त्यानंतर हा विषाणू जगभरात पसरत आहे. भारतात कोविड -१९ महामारीची दुसरी लाट या वर्षी एप्रिलमध्ये सुरू झाली असून कोरोना व्हायरसची प्रकरणे चार लाखांच्या पुढे गेली होती. त्यानंतर मे महिन्यात लाटेची प्रकरणे कमी होऊ लागली. त्यामुळे काही तज्ज्ञांनी ऑगस्ट-सप्टेंबरनंतर तिसऱ्या लाटेचा इशारा दिला होता. कानपूर आणि हैदराबादच्या आयआयटीने ऑगस्टच्या मध्यावर कोविड -१९ ची आणखी एक उद्रेक किंवा तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवला होता. तसेच विषाणूच्या प्रकारानुसार ऑक्टोबरमध्ये ते शिगेला पोहोचू शकतो, असेही म्हटले होते.