नवी दिल्ली – भारतात गेल्या वर्षी फेबुवारी-मार्चमध्ये आलेली कोरोनाची पहिली लाट नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये आटोक्यात आली. आता दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातले आहे. त्यामुळे ही लाट कधी संपेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, ही लाट ओसरण्यास डिसेंबर उजाडणार असल्याचा अंदाज भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी वर्तविला आहे.
यंदा २०२१ च्या अखेरपर्यंत कोरोना परिस्थिती थोडी स्थिर होईल. त्यानंतर साधारणतः २०२२ च्या मध्यात संपूर्ण जग पुन्हा कोरोना मुक्त होईल, त्यामुळे सध्या तरी कोरोनाविरुद्धची ही लढाई भारताला युद्धपातळीवर लढावी लागणार आहे.
डॉ. गुलेरिया यांनी यासंदर्भात माहिती देताना स्पष्ट केले की, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनविषयी लोकांमध्ये गांभीर्य नसल्याने कोरोना संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता अधिक प्रमाणात नागारीकांचे लसीकरण करुन त्यांना सुरक्षित करणे हाच मार्ग उरला असल्याचे त्यांनी म्हटले.
देशात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात लसीकरण मोहीम सुरु झाली तेव्हा अनेकांना कोरोनाची साथ आटोक्यात आली, असे वाटलत असतानाच कोरोनाच्या विषाणू नव्या स्ट्रेनसह परत आला. त्यामुळे गेल्या दिड महिन्यापासून देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.
भारतात सध्याच्या काळात प्रत्येक दिवशी २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून येत आहेत. हा आकडा असाच वाढत गेल्यास आगामी काळात भारताची परिस्थिती अमेरिका, ब्राझील आणि युरोपामधील देशांपेक्षाही बिकट होऊ शकते.
दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूदर कमी असला तरी रुग्णांच्या प्रचंड संख्येमुळे आरोग्ययंत्रणा कोलमडण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात ५६८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात तब्बल ६७ हजार ४६८ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ६१ हजार ९११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आणखी सहा ते आठ महिने तरी सर्वांनाच कोरोनाबाबत काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच कडक नियमावलीचे पालन करावे लागणार आहे, असेही डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.