मुंबई – अखेर राज्यातील २५ जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध शिथील झाले आहेत. तर, ११ जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध कायम राहणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. कोरोना संसर्ग कमी असलेल्या जिल्ह्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार असून तेथील व्यवसाय व उद्योगाला चालना मिळणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य टास्क फोर्सची बैठक काल झाली. त्यात कोरोना संसर्ग सद्यस्थिती आणि उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. आरोग्य विभागाने निर्बंध शिथीलतेबाबत सादर केलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. कोरोनाची दुसरी लाट राज्यात ओसरली आहे. केवळ काही जिल्ह्यांमध्ये संसर्ग कायम आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम ठेवून अन्य जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावाला आता मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.
या जिल्ह्यांना दिलासा
कोरोना निर्बंधांमध्ये शिथीलता मिळालेल्या २५ जिल्ह्यांमध्ये परभणी, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशीम, हिंगोली, रायगड, ठाणे, मुंबई, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे.
या जिल्ह्यांना दिलासा नाही
राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. त्यात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, बीड, अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम राहणार आहेत.
ही सूट मिळणार
राज्यातील २५ जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध शिथील होताना सोमवार ते शनिवार दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार आहेत. केवळ रविवारी पूर्णपणे बंद असणार आहे. ज्या दुकाने आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे दोन्ही लसीकरण झाले आहे तेथे ५० टक्के सुरू राहण्यास मुभा देण्यात येणार आहे. दुकाने, रेस्टॉरंट, सिनामागृहे, शो रुम्स यांना अटीशर्थी घालून परवानगी मिळणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतर आता त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत.