नवी दिल्ली – कोरोनाच्या संसर्गाबरोबरच तो रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या कठोर उपाययोजनांना नागरिक कंटाळल्याचे दिसून येत आहे. कोरोना निर्बंध जाचक वाटू लागल्याने आता हळूहळू संयम संपू लागला आहे. त्याचीच पहिली ठिणगी नेदरलँडमध्ये पहायला मिळाली आहे. कोरोना लसीचा पास सक्तीचा करण्यात आल्याने नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. यास हिंसक वळण लागले असून दंगलीसह जाळपोळीमुळे नेदरलँडमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे.
गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव असून काही देशात तो आता कमी होत असतानाच अद्यापही काही देशांमध्ये त्याचा संसर्ग कायम आहे यावर मात करण्यासाठी लशीकरणासह विविध उपाययोजना अनेक देशांमध्ये करण्यात येत आहेत. परंतु काही समाजकंटकांकडून या नियमांचे पालन करण्याऐवजी उल्लंघन करण्यात येत आहे. त्यामुळे मग कोरोनाचा समूळ नायनाट कसा होईल ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नेदरलँड्समध्ये लसीकरण न केलेल्या नागरिकांसाठी काही ठिकाणी प्रवेशावर बंदी घालण्याच्या सरकारी योजनेच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. रॉटरडॅम शहरात कोरोना या नवीन नियमांबाबत नागरिकांकडून निषेध सुरू असताना दंगलीसारखी परिस्थिती निर्माण झाली. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि पोलिसांच्या गाड्या पेटवून दिल्या.
दंगलखोरांनी जाळपोळ सुरू केल्याने अधिकाऱ्यांना शहरातील मुख्य रेल्वे स्थानक बंद करावे लागले. परिस्थिती चिघळल्यावर पोलिसांनी सावधगिरीने गोळीबार केला आणि पाण्याच्या तीव्र फवाऱ्याचा वापर केला. हिंसक निदर्शनादरम्यान झालेल्या गोळीबारामुळे काही जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये रॉटरडॅममध्ये एका व्यक्तीवर गोळी झाडल्याचे दिसत आहे. या व्यक्तीवर गोळी कोणी आणि कशी मारली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांनी सांगितले की, रॉटरडॅम शहराच्या मध्यभागी परिस्थिती अजूनही तणावपूर्ण असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही दंगलखोरांना अटक करण्यात आली असून यात पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण सात जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, येथील सरकारने एक कायदा करून देशात कोरोना विषाणू पास प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला असून हा पास केवळ पूर्ण लशीकरण झालेल्या किंवा कोविड -१९ मधून बरे झालेल्या व्यक्तींना देण्यात येणार आहे. सदर पास धारक व्यक्तींना देशात कुठेही फिरता येईल, तर पास नसलेल्यांना मात्र बंदी घालण्यात येईल.