मुंबई – कोरोना संक्रमणाचा सामना करण्यासाठी दोन डोसमध्ये ८४ दिवसांचे अंतर निश्चित करण्यात आले आहे. तर कोरोनातून बरे झालेल्यांनी ९० दिवस झाल्याशिवाय लस घ्यायची नाही, असे सांगण्यात आले आहे. मात्र या सर्व गोंधळात ज्यांनी कोरोनावर मात केली आहे त्यांना दुसऱ्या डोसची गरज नाही, असेही बोलले जात आहे. कारण ज्यांना कोरोना होऊन गेला आहे त्यांच्या शरीरात पुरेशा अँटीबॉडीज विकसित झालेल्या असतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काही संशोधनांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा सामना करण्यासाठी दोन्ही डोस आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. पण नेमके काय करावे किंवा करू नये, याबाबत तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊया…
आरोग्यक्षेत्रातील तज्ज्ञांनी कोरोना संक्रमणानंतर शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीज जास्त दिवस मुक्काम करीत नाहीत, असे म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही डोस आवश्यक आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. काही संशोधनांमध्ये संक्रमणानंतर ९० दिवस अँटीबॉडीज राहतात, पण त्यानंतर लस घ्यावीच लागेल, असा सल्ला देण्यात आला आहे. काही संशोधकांनी संक्रमणानंतर ठराविक दिवसांनी लस दिल्यास एकच डोस पुरेसा आहे, असे ठासून सांगितले आहे. अर्थात इतर लोकांमध्ये दोन डोस घेऊन तयार होणाऱ्या अँटीबॉडीजच्या बरोबरीने त्यांच्याच अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात, असा दावाच त्यांनी केला आहे.
संक्रमण होऊन गेलेल्यांनी दोन डोस घ्यावे की एकच डोस घ्यावा, याबाबत दोन मतप्रवाह आहेत आणि दोन संशोधनेही आहेत. कारण नवे व्हेरियंट्स अँटीबॉडीजला सहज नमविण्याची क्षमता ठेवतात, असे मानले जात आहे. भारतात सध्या तरी सर्वांनाच दोन्ही डोस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अर्थात एकूणच संभ्रमाची स्थिती लक्षात घेता वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रत्येकाने दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. यात संक्रमण झालेले आणि न झालेले या साऱ्यांचाच समावेश होतो.