नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना संसर्ग बरा झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात कोणताही धोका नाही. या विषयावर एम्समध्ये अभ्यास करण्यात आला असून, त्यानुसार हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याविषयी माहिती जाहीर केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी एम्सच्या अभ्यासाचे निकाल सांगताना सांगितले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान २० डिसेंबर ते २० जानेवारी २०२२ या कालावधीत एम्समधील ५३ रुग्णांवर अभ्यास करण्यात आला. कोरोना झाल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यापैकी ३२ जणांना अर्धवट आणि २१ जणांना सामान्य भूल देण्यात आली. यापैकी कोणालाही मृत्यूचा सामना करावा लागला नाही. उर्वरित २१ रुग्णांपैकी चार जण मृत पावले. परंतु, या चार मृत्यूंची कारणे कोरोना नव्हती. त्यामुळे सध्याच्या ओमिक्रॉन प्रकाराचा संसर्ग झाला असेल आणि त्यानंतर शस्त्रक्रिया झाली तरी त्याचा आरोग्याला धोका नाही. तसेच एका प्रश्नाच्या उत्तरात आरोग्य विभाग म्हणाले की, कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलांची सिझेरियन प्रसूती करणेदेखील पूर्णपणे सुरक्षित आहे.
यापूर्वी जागतिक स्तरावर केलेल्या अभ्यासानुसार संसर्ग बरा झाल्यानंतर सहा ते आठ आठवडे ऑपरेशन करू नये. कारण त्यामुळे मृत्यूचा धोका चार पटीने वाढू शकतो, असे सांगण्यात आले होते. या प्रसंगी आयसीएमआर महासंचालक बलराम भार्गव यांनी आणखी एक अभ्यास अहवाल जारी केला आहे. ज्यामध्ये लसीकरण केलेल्या कोरोना संक्रमितांमध्ये कमी मृत्यू दराची पुष्टी झाली आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान (१५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२१), रुग्णालयात दाखल झालेल्या व ज्यांचे लसीकरण झाले आहे अशा ५६४ कोरोना रुग्णांपैकी १०.२ टक्के रुग्णांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. तर ३६.१ टक्के रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवावे लागले होते. ५.४ टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यामुळे पूर्ण लसीकरण करूनही मृत्यू ओढावण्याचे प्रमाण कमी आहे, असे सांगण्यात आले आहे.