मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोनामुळे अनेक कुटुंब देशोधडीला लागले, अनेकांच्या नोकऱ्या लागल्या, अनेक जण अडचणीत आले पण उद्योगपती गौतम अदानी यांचे उलट झाले आहे. कारण, कोरोना अदानींना पावला आहे. गेल्या दोन वर्षातील त्यांच्या संपत्तीची आकडेवारी पाहिली तर हे स्पष्ट होत आहे की, अदानींची संपत्ती तब्बल ३०० टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे अदानी हे आता जगातील श्रीमंतांच्या यादीत जाऊन पोहचले आहेत.
ब्लूमबर्गच्यावतीने अब्जाधीशांसंदर्भातला अहवाल प्रसिद्ध केला जातो. त्यातून अदानींच्या संपत्तीची माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, अदानी हे आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क यांना थेट टक्कर देत असल्याचे दिसून येत आहे. अदानी समुहातील विविध कंपन्यांनी कामगिरी अतिशय चांगली असल्याने सहाजिकच शेअर बाजारातही त्याचे पडसाद उमटत आहेत. म्हणूनच त्यांच्या शेअरचे भाव दिवसागणिक वाढत आहेत. गेल्या तिमाहीतील आकडेवारी पाहून त्याची स्पष्टता येत आहे. तेल, बंदरांचा विकास, रासायनिक खते, सिमेंट, कृषी उत्पादने आदी क्षेत्रात अदानी समूह चमकदार कामगिरी करीत आहे. कोरोनाच्या काळात तर त्यांच्या कंपन्यांना मोठी संधी प्राप्त झाली. गेल्या तीन महिन्यात अदानींनी तब्बल ३१ अब्ज डॉलरहून अधिक कमाई केली आहे. त्यातुलनेत मस्क यांची संपत्ती गेल्या ३ महिन्यात केवळ १.१ अब्ज डॉलरने वाढली आहे.