नवी दिल्ली – देशात कोरोना महामारीदरम्यान औषधांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाला आहे. भारतात पहिल्या लाटेदरम्यान अंँटिबायोटिकचा अधिक वापर झाल्याचा दावा अमेरिकेच्या वॉशिंग्टन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या बाधितांच्या उपचारात अँटिबायोटिकचा अतिवापर झाला आहे. त्यामुळे अँटिबायोटिकची विक्रीसुद्धा वाढली आहे.
कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेदरम्यान जून २०२० पासून ते सप्टेंबर २०२० पर्यंत अँटिबायोटिकच्या २१.६४ कोटी डोसचा अधिक वापर झाला आहे. महामारी उच्चांकी पातळीवर असताना अशाचप्रकारे अँटिबायोटिकचे ३.८ कोटींहून अधिक डोस वयस्क लोकांना देण्यात आले.
औषधांचा गैरवापर आरोग्यासाठी घातक आहे. अँटिबायोटिक जीवाणूंच्या संसर्गात अधिक परिणामकारक असतात, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या बार्नेस जेविश रुग्णालयातील महामारीचे रोगतज्ज्ञ सुमंथ गांद्रा सांगतात, महामारीनंतर भारतातच नव्हे, तर जगभरात अँटिबायोटिक रेजिस्टंटचा धोका आहे. अँटिबायोटिकच्या अत्याधिक वापरामुळे सामान्य जखम आणि निमोनियासारखे आजार बरे करणे कठीण होतात. त्यामुळे असे आजारही गंभीर आणि जीवघेणे ठरू शकतात.
वयस्कांमध्ये वापर वाढला
भारतात २०२० मध्ये १६२९ कोटी अँटिबायोटिकच्या डोसची विक्री झाली. २०१८ आणि २०१९ च्या तुलनेत ही विक्री थोडी कमी आहे. परंतु शास्त्रज्ञांनी वयस्कांकडून अँटिबायोटिकचे डोस घेण्याच्या आकडेवारीवर नजर टाकली तर लक्षात आले की, २०१८ मध्ये ७२.६, २०१९ मध्ये ७२.५ टक्के अँटिबायोटिकचे डोस घेण्यात आले. २०२० मध्ये हे डोस वाढून ७६.६ टक्क्यांपर्यंत गेले. २०२०मध्ये एजिथ्रोमायसिनच्या विक्रीत सर्वाधिक ५.९ टक्के वाढ झाल्याची नोंद झाली आहे. २०१८ मध्ये ४ टक्के आणि २०१९ मध्ये ४.५ टक्के विक्री झाली होती.
डॉक्सी आणि फरावपेनेमची वाढली मागणी
कोरोना श्वासाशी संबंधित आजार आहे. श्वासाशी संबंधित संसर्गाच्या उपाचारामध्ये डॉक्सीसायक्लिन आणि फरावपेनेमचा वापर होतो. या दोन्ही अँटिबायोटिकचा वापर अचानक वाढला आहे. अमेरिका आणि इतर विकसित देशांमध्ये महामारीदरम्यान अँटिबायोटिकचा वापर घटला, तर भारतात वाढला आहे. कोरोना संक्रमितांना अँटिबायोटिकचा अधिक वापर झाल्याने त्याची अधिक विक्री झाल्याचे शास्त्रज्ञ सांगतात.