नवी दिल्ली – उपलब्ध लशीच्या पुरवठ्याची स्थिती पाहूनच मुलांच्या तसेच किशोरवयीन मुलांच्या कोविड लसीकरणाबाबत केंद्र सरकार अंतिम निर्णय घेणार आहे, असे कोविड कार्यदलाचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी रविवारी सांगितले. अनेक देशांमध्ये महामारीच्या दोनहून अधिक लाटा पहायला मिळाल्या आहेत. भारतात कोरोनाचा संसर्ग कमी होऊन दुसरी लाट ओसरत असली तरी महामारीचा सर्वात वाईट काळ संपला आहे असे मानणे योग्य ठरणार नाही, असे डॉ. पॉल यांनी स्पष्ट केले.
डॉ. पॉल पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होते. ते म्हणाले, की अनेक देशांनी मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली हे आम्हाला ठाऊक आहे. आम्ही सर्व वैज्ञानिक तथ्य आणि तर्कांच्या आधारावर लशीच्या पुरवठ्याची स्थिती पाहूनच अंतिम निर्णय घेणार आहोत. लसीकरण कार्यक्रमात जायडस कॅडिला लशीचा समावेश करण्याची तयारी उत्तमरित्या केली जात आहे. त्याचे प्रशिक्षणही सुरू आहे. एनटीएजीआयचा सल्ला घेऊनच लवकरच त्या लशीचा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे.
देशात कोविडच्या कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुतनिक-व्ही या तीन लशी उपलब्ध आहेत. या लशींद्वारे १८ वर्षांच्यावरील सर्वांचे लसीकरण केले जात आहे. या सर्व लशींमध्ये दोन डोसचा समावेश आहे. आता जायडस कॅडिलाची स्वदेशी सुईमुक्त कोविड लस जायकोव्ह -डी अनावरणासाठी तयार आहे. ही लस १२ ते १८ वर्षांच्या किशोरवयीन मुलांसाठी उपलब्ध होईल. आपत्कालीन वापरासाठी या लशीला मान्यता मिळाली आहे.
दरम्यान, केंद्रीय औषधे प्राधिकरणाच्या एका तज्ज्ञ पॅनलने काही अटी-शर्तींवर २ ते १८ वर्षांच्या मुलांना भारत बयोटेकच्या लशीला मंजुरी देण्याची शिफारस केली आहे. औषधे महानियंत्रकाकडून त्याला मंजुरी मिळाली तर जायकोव्ह-डी नंतर १८ वर्षांच्या कमी वयाच्या मुलांसाठी मान्यता मिळणारी ही दुसरी लस ठरणार आहे.