मुंबई – सर्वसामान्य नागरिकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल होणारी रेल्वे गेल्या एक वर्षापासून थंड पडली आहे. कोरोनामुळे पहिल्या लॉकडाऊनमध्ये रेल्वेला पूर्ण विश्रांती होती. तर त्यानंतर मर्यादित स्वरुपात रेल्वे धावत आहे. साधी प्लॅटफॉर्म तिकीट बंद केली तरीही २०१९-२० च्या तुलनेत २०२०-२१ चे उत्पन्न तब्बल ९४ टक्क्यांनी घटले आहे.
कोरोना संकटाच्या कालावधीत प्लॅटफॉर्म तिकीटांशिवाय स्थानकावर फिरणाऱ्यांसाठी तर कायमची दारे बंद करण्यात आली होती. याशिवाय प्लॅटफॉर्म तिकीटही बंद करण्यात आले होते. केवळ प्रवेशद्वारापर्यंत नातेवाईकांना सोडा आणि बाहेर पडा, अशी व्यवस्था होती. आजही प्लॅटफॉर्म तिकीटांची विक्री बंदच आहे. २०२०-२१च्या फेब्रुवारीपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीटांच्या विक्रीतून १० कोटी रुपयांची कमाई झाली. तर २०१९-२० च्या दरम्यान १६०.८७ कोटी रुपयांचे उत्पन्न केवळ प्लॅटफॉर्म तिकीटांच्या विक्रीतून आले होते. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांतील ही सर्वाधिक कमाई नोंदविण्यात आली होती. पण मार्च २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊन घोषित केल्यानंतर सारेच चित्र बदलले.
प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपयांचे
देशात लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयांवरून ३० रुपयांपर्यंत वाढविण्यात आले होते. महत्त्वाच्या शहरांमध्ये तर चक्क ५० रुपये दर ठेवण्यात आले होते. अर्थात हे केवळ काही दिवसांसाठी होते. त्यानंतर तिकीटांचे दर नियमीत करण्यात आले.
पुन्हा सुरू झाली विक्री
प्लॅटफॉर्म तिकीटांची विक्री दिल्ली विभागातील ८ मोठ्या स्थानकांवर सुरू झाली असून दर ३० रुपये राहणार आहे. या स्थानकांमध्ये नवी दिल्ली, दिल्ली जंक्शन, हजरत निझामुद्दीन, आनंद विहार, मेरठ सिटी, गाझियाबाद, दिल्ली सराय रोहिल्ला आणि दिल्ली कँट यांचा समावेश आहे.